महाविकास आघाडीचा जागावाटपाचं कुठपर्यंत आलं? संजय राऊतांनी केलं सूचक विधान; म्हणाले....
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी खेड शिवापूर भागात पकडण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांवरही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आमच्यातील जागावाटपाचा विषय लवकरच मार्गी लागेल. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर ते मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतील. त्यावेळी मीदेखील तेथे असेल. आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरत लवकर हा प्रश्न मार्गी लागेल, असे राऊत म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
कदाचित आज जागावाटपाचा विषय मार्गी लागेल
नाना पटोले हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. काँग्रेस पक्षातील एखाद्या व्यवस्थेविषयी मी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही. मात्र बाळासाहेब थोरात हे अगोदर शरद पवार यांची भेट घेऊन नंतर मातोश्रीवर येतील. ते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. आम्हीदेखील तिथे उपस्थित असू. कदाचित तिथेच आमची इतर चर्चा होईल आणि जागावाटपाचा विषय आम्ही संपवून टाकू. आमच्यात फार अडचणी नाहीत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जागावाटपाचा हा मुद्दा लवकर संपेल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.
50 कोटीपेक्षा जास्त रक्कम पोहोचवण्यास सुरुवात झाली
खेड-शिवापूर टोलनाक्यावर 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका वाहनातून 5 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "मिंधे गटाच्या आमदारांना 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागली त्याच रात्री ही रक्कम पोहोचवण्यात आली. त्यानंतर इतर उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने पोहोचवण्यात येत आहेत. हे सगळं पोलीस बंदोबस्तात होत आहे," अशी टीका राऊत यांनी केली.
10 कोटी रुपये सुखरुप पोहोचवण्यात आले
तसेच "काल संध्याकाळी काय झाडी, काय डोंगरातून ही रक्कम जाणार होती. मात्र ही रक्कम पकडण्यात आली. एकूण 15 कोटी रुपये पकडण्यात आले. यातील फक्त 5 कोटी रुपये दाखवण्यात आले. उर्वरित 10 कोटी रुपये व्यवस्थित पोहोचवण्यात आले. त्या ठिकाणाच्या पोलीस अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून आला. त्यानंतर 10 कोटी रुपये सुखरुप पोहोचवण्यात आले. आमचे कार्यकर्ते तिथे गेल्यामुळे त्यांना पाच कोटी रुपये पकडल्याचे दाखवावे लागले," असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा :
Assembly Election 2024 : आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात, उमेदवारांकडे फक्त सहा दिवस!