काटोल विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी; माजी जिल्हा प्रमुखाचे अनिल देशमुखांना आव्हान?
काटोल विधानसभा मतदार संघातून भाजपचे नेते आशिष देशमुख बंडाच्या भूमिकेत असल्याची चर्चा रंगत असताना काटोल विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटोल विधानसभा मतदार संघातून (Katol Assembly Constituency) भाजपचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) बंडाच्या भूमिकेत असल्याची चर्चा रंगत असताना काटोल विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. काटोलचे माजी जिल्हा प्रमुख राजु हरणे (Raju Harne) यांनी वेगळा पवित्रा घेत पक्षात बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या 29 ऑक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत. शिवसेना (उबाठा) काटोल विधानसभेच्या प्रमूख पदाधिकार्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेतला आहे. त्यामुळे काटोल विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले आहे.
काटोल विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी
महाविकास आघाडीत काटोल विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला सुटली आहे. या मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख अथवा त्यांचे पुत्र सलील देशमुख हे निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना स्वत: अनिल देशमुख म्हणाले आहे की, माझी तिकीट जाहीर झाली असली तरी काटोल विधासभा मतदार संघातून सलील देशमुख यांनीच निवडणूक लढावे, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी नुकत्याच काटोलमध्ये झालेल्या निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केली होती.
दरम्यान पक्षातील कार्यकर्त्यांसोबत बोलून काटोलमधून अनिल देशमुख लढणार की सलील देशमुख याचा निर्णय घेऊ. तसेच 28 तारखेला अर्ज भरला जाईल असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला सुटली असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता देशमुख पितापुत्रांना काटोलचे माजी जिल्हा प्रमुख राजु हरणे हे आव्हान देतील का? हे पाहणे मत्वाचे ठरणार आहे.
भाजप नेते आशिष देशमुख बंडखोरीच्या तयारीत?
नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात भाजपचं तिकीट चरण ठाकूर यांना मिळाले असल्याने स्थानिक भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र याच मतदारसंघातून भाजपचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे विधानसभेची तयारी करत होते. परिणामी, भाजप नेते आशिष देशमुख हे आता बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. आज हातला येथे आयोजित दिवाळी मिलन निमित्त ते अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते आज नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाने काटोल विधानसभेतून अनिल देशमुख यांच्या विरोधात चरण ठाकुर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे आता आशिष देशमुख यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या