नाना काटेंनी अखेर बंडाची तलवार म्यान केली; पर्वतीमध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांची बंडखोरी कायम!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : चिंचवडमधील नाना काटे हे असे बंडखोर आहेत, ज्यांना शरद पवार आणि अजित पवारांकडूनही संपर्क साधला गेला होता.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार, असा निर्धार केलेल्या चिंचवडमधील नाना काटे यांनी अखेर आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे चिंचवडमधील महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाना काटे यांची बंडखोरी टाळण्यासाठी आज शरद पवार आणि अजित पवार फोनाफोनी केली होती. त्यामुळे नाना काटे कोणता निर्णय घेतात? याकडे लक्ष होते. अखेर नाना काटे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे चिंचवडमधील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना दिलासा मिळाला आहे. नाना काटे यांनी शंकर जगताप यांना पाठिंबा दिला आहे. चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईर यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत होईल.
चिंचवडमध्ये भाजपने शंकर जगतापांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना उमेदवारी मिळाली नव्हती. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना धक्का बसण्याची चिन्हे होती. राज्यात प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, पण चिंचवडमधील नाना काटे हे असे बंडखोर आहेत, ज्यांना शरद पवार आणि अजित पवारांकडूनही संपर्क साधला गेला होता.
आबा बागुल माघार घेणार नाहीत
दरम्यान, चिंचवडमध्ये नाना काटे यांनी तलवार म्यान केली असली, तरी पर्वतीमधून आबा बागुल निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची शिष्टाई अयशस्वी झाली आहे. आबा बागुल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. पर्वतीमधून महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या