Anna Bansode: अजित पवारांनी पिंपरीत नव्या चेहऱ्याला संधी दिली तरी चालेल, अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला, नेमकं काय म्हणाले?
Pimpri Assembly constituency: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून काही जण इच्छुक असल्यामुळे अद्याप या जागेवरील उमेदवाराचे नाव जाहीर केले नसल्याच्या देखील चर्चा आहेत, या दरम्यान अण्णा बनसोडेंनी माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
पुणे: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका काही दिवसांवर आल्या असतानाच
पक्षांनी आपल्या उमेदवार याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. अशातच काही ठिकाणच्या नेत्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील देण्यात येत आहेत. अशातच पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीबाबत चर्चांना उधाण आले आहे, त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास काहींनी त्यांचा प्रचार न करण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून काही जण इच्छुक असल्यामुळे अद्याप या जागेवरील उमेदवाराचे नाव जाहीर केले नसल्याच्या देखील चर्चा आहेत, या दरम्यान अण्णा बनसोडेंनी माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
एपीबी माझाशी बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले, अजित दादांनी माझ्या ऐवजी नव्या उमेदवाराला संधी दिली तरी माझी काही हरकत नसेल. महायुतीच्या नाराज गटाने तीव्र विरोध केल्यानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. अद्याप एबी फॉर्म न मिळालेल्या बनसोडेंनी अशाप्रकारे आणखी सस्पेन्स वाढवलेला आहे. बनसोडेंना तिकीट दिलं तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. अजित दादांनी पक्षातील काळूराम पवार, भाजपचे अण्णा पिल्ले, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे अथवा शिंदे गटाच्या जितेंद्र ननावरे यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी. असा ठराव या नाराज गटाने केला आहे. त्यावर अजित दादा जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याची प्रतिक्रिया आमदार बनसोडेंनी देत, वेळ पडल्यास निवडणुकीतुन माघार घेण्याची तयारी दर्शवली. मात्र अपक्ष लढणार का? असा प्रश्न विचारला असता, दादांच्या निर्णयानंतर मी पुढची भूमिका जाहीर करेन. असं निवडणुकीतून माघार घेणार नाही, याचे ही संकेत देखील त्यांनी दिले आहेत.
नेमकं काय म्हणालेत अण्णा बनसोडे?
अजित पवार कोणता निर्णय घेतील तो मला मान्य आहे, उमेदवारी कोणाला द्यायची ते ठरवतील. पिंपरी विधानसभेचा निर्णय अजित पवार घेतील, ते कोणता निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. जर तुम्हाला तिकिट जाहीर केलं नाही तर, त्यावर प्रतिक्रिया देताना अण्णा बनसोडे बोलताना म्हटले, ते नंतर ठरेल, अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, अजित पवार लवकरच निर्णय घेतील, तो निर्णय अद्याप झालेला नाही. योगेश बहल हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते सर्वजण चर्चा करतील आणि उमेदवार ठरवतील, आणि पक्षाच्या वतीने जो उमेदवार दिला जाईल त्यांना योगेश बहल निवडून देण्याचा प्रयत्न करतील, असंही बनसोडे यांनी म्हटलं आहे.
अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर प्रचार करणार नाही, महायुतीतील नाराज गटाचा ठराव
पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर आम्ही प्रचार करणार नाही. असा ठराव महायुतीतील अठरा माजी नगरसेवकांना केला आहे. यात अजित पवार गटाचे काळूराम पवार, भाजपचे अण्णा पिल्ले, शिंदे गटाचे जितेंद्र ननावरे अन आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या चार इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी महायुतीच्या या गटाने केलीये. अजित दादांना हा विरोध ठाऊक असल्यानेच त्यांनी इतर आमदारांप्रमाणे अण्णा बनसोडेंना अद्याल एबी फॉर्म दिलेला नाही.