Anna Bansode: पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
Pimpri Assembly constituency: आज 38 जणांची यादी जाहीर झाली, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
पुणे: अजित पवारांच्या प्रत्येक संकट काळात त्यांच्या सोबतीने राहिलेल्या अण्णा बनसोडेंना पिंपरीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र बनसोडेंच्या समोर पक्षांतर्गत आणि महायुतीतील नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान उभं आहे. नव्या चेहऱ्यासाठी फिल्डिंग लावणारे शहराध्यक्ष योगेश बेहलांनी ही तातडीनं बनसोडे यांची भेट घेतली आहे. सोबतच मी त्यांचाच प्रचार करणार असं ते आत्तातरी ठणकावून सांगत आहेत. आज 38 जणांची यादी जाहीर झाली, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी आहे. महायुतीत इतर घटक पक्ष आहेत, त्यांना विश्वासात घेऊन काम केलं तर नाराजी राहणार नाही, पिंपरीत महायुतीचा आणि राष्ट्रवादीचा विजय होणार आहे, अण्णा बनसोडे यांच्या प्रचारात आम्ही सर्वांना घेऊ. सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ, असंही यावेळी अण्णा बनसोडेंना उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रतिक्रिया केली आहे.
अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर प्रचार करणार नाही
पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर आम्ही प्रचार करणार नाही. असा ठराव महायुतीतील अठरा माजी नगरसेवकांना केला होता. यात अजित पवार गटाचे काळूराम पवार, भाजपचे अण्णा पिल्ले, शिंदे गटाचे जितेंद्र ननावरे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या चार इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी महायुतीच्या या गटाकडून करण्यात आली होती. अजित पवारांना हा विरोध ठाऊक असल्यानेच त्यांनी इतर आमदारांप्रमाणे अण्णा बनसोडेंना अद्याल एबी फॉर्म दिलेला नाही अशा चर्चा आहेत पण आज जाहीर झालेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
अजित पवार कोणता निर्णय घेतील तो मला मान्य - अण्णा बनसोडे
तर एबी फॉर्म न दिल्याने पिंपरीमध्ये उमेदवार बदलाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अण्णा बनसोडे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, अजित पवार कोणता निर्णय घेतील तो मला मान्य आहे, उमेदवारी कोणाला द्यायची ते ठरवतील. पिंपरी विधानसभेचा निर्णय अजित पवार घेतील, ते कोणता निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. जर तुम्हाला तिकिट जाहीर केलं नाही तर, त्यावर प्रतिक्रिया देताना अण्णा बनसोडे बोलताना म्हटले, ते नंतर ठरेल, अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, अजित पवार लवकरच निर्णय घेतील, तो निर्णय अद्याप झालेला नाही. योगेश बहल हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते सर्वजण चर्चा करतील आणि उमेदवार ठरवतील, आणि पक्षाच्या वतीने जो उमेदवार दिला जाईल त्यांना योगेश बहल निवडून देण्याचा प्रयत्न करतील, असंही बनसोडे यांनी म्हटलं होतं.