MIM चा गनिमी कावा अजून बाकी, महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठी खळबळ? जलील यांच्या विधानाने नवा सस्पेन्स!
एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी विधानसभा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक यावर भाष्य केलं आहे. आम्ही काय गनिमी कावा केला आहे, ते लवकरच समजेल, असं जलील म्हणाले आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabh Election 2024) रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळसरळ लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दोन आघाड्यांव्यतिरिक्त अनेक छोट-मोठे पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राज्यात एमआयएम (AIMIM) पक्षाचा एक ठरलेला मतदार आहे. या पक्षाचे महाराष्ट्रात आमदार आणि खासदार राहिलेले आहेत. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत हा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावरच आता एमआयएमचे नेते इम्तीयाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या तुम्हाला एमआयएमचा गनिमी कावा समजेल, असं जलील म्हणाले आहेत. ते आज (28 ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.
दहा जागांसाठी उमेदवारी निश्चित
आमचा प्रमुख विरोधक हा भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीशी आमची मैत्री आहे, असं बिलकुल नाही. यंदा आम्ही कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत साधारण 10 जागा लढवण्यासाठी आम्ही उमेदवारी निश्चित केली आहे, अशी माहिती जलील यांनी दिली.
तसेच, वारीस पठाण आमचे वरिष्ठ नेते आहेत. निश्चित त्यांच्याबद्दल आम्ही विचार करत आहोत. वारीस पठाण यांच्यासाठी आम्ही दोन जागांचा विचार केला आहे. लवकरच त्यावर निर्णय जाहीर होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
उद्या दुपारपर्यंत गनिमी कावा समजेल
यासह, नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी मी अर्ज घेऊन तो भरून ठेवलेला आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. आम्हाला गनिमी कावा माहिती आहे. गनिमी कावा नेमका कसा असतो, हे उद्या दुपारपर्यंत तुम्हाला समजेल. राजकारणात थोडा सस्पेन्स असणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट ही उघड करायची नसते, असं सूचक विधानही जलील यांनी केलं.
महाविकास आघाडीशी केला होता पत्रव्यवहार
जलील यांच्या विधानाचे सध्या अनेक अर्थ काढले जात आहेत. काही दिवसांपूर्वी जलील यांनी विधानसभा निवडणुकीवर एमआयएम पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांत आम्ही महाविकास आघाडीशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आम्ही काँग्रेसशी बोललो, उद्धव ठाकरे गटाशीही आमची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनीही आम्हाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली आहे, असे जलील म्हणाले होते. दरम्यान, जलील यांनी गनिमी काव्याचा उल्लेख केल्यामुळे एमआयएम नेमकं काय करणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :