Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाचा उमेदवार मैदानात, सदा सरवणकर माहीमधून लढणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : शिंदे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली असून अमित ठाकरेंच्या विरोधात सदा सरवणकर हे मैदानात आहेत.
Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाकडून (Shinde Group) पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 45 आमदारांची ही यादी असून अनेक विद्यमान आमदारांना या यादीमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.
आदित्य ठाकरे यांना वरळीमधून जेव्हा पहिल्यांदा संधी देण्यात आली होती, त्यावेळी मनसेकडून कोणताही उमेदवार मैदानात उतरवण्यात आला नव्हता. शिवसेना पक्षात त्यावेळी फूट पडली नव्हती. पण सद्य स्थितीला राजकारणातील बदललेल्या समीकरणांनंतर शिंदे गटाने अमित ठाकरे यांच्या विरोधात त्यांचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेही अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मनसेकडून अमित ठाकरेंना मैदानात उतरवलं
माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरु होत्या. मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाली. पण आता शिंदे गटाचा उमेदवार मैदानात असल्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी ही लढाई सोप्पी नाही, हे चित्र जवळपास स्पष्ट झालंय. त्याचप्रमाणे जर उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघातून उमेदवार दिला तर या तिहेरी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष राहिल.
शिंदे गटाची पहिली यादी जाहीर
भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाने एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर केली असून यामध्ये बऱ्याच विद्यमान आमदारांची नावं आहेत. त्याचप्रमाणे कोकणच्या मैदानात उदय सामंत आणि किरण सामंत ही भावांची जोडी निवडणूक लढवणार आहेत. तसेच संदीपान भुमरे, आनंदराव अडसूळ, दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र रिंगणात आहेत. जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.