Maharashtra Assembly Elections 2024 : सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे की उदय सांगळे? कोण उधळणार विजयाचा गुलाल?
Sinnar Assembly Constituency : 2019 सालच्या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत कायमच निर्णायक भूमिका बजावणारा मतदारसंघ म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयात सिन्नरने सिंहाचा वाटा उचलला. आता सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Faction) उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली आहे. सांगळे यांच्या प्रवेशामुळे ही लढत चुरशीची होणार असून सिन्नर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षाचं सिन्नर विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राहिलंय. 2014 विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी शिवसेनचा भगवा डौलाने फडकवला. काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा 20 हजारांनी पराभव केला होता. 2019 सालच्या निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांचा 2072 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.
सिन्नरमधून कोण मारणार बाजी?
यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाने माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. तर सिन्नरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. सिन्नरच्या उमेदवारीसाठी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह काहीजण इच्छुक होते. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) नाशिकमधून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधून सर्वाधिक म्हणजे सुमारे सव्वा लाखाचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही जागा सुरक्षित मानली जात होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने उदय सांगळे यांना उमेदवारी जाहीर केली. आता सिन्नरमध्ये उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे (Uday Sangle vs Manikrao Kokate) असा सामना पाहायला मिळणार आहे. या चुरशीच्या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या