Girish Mahajan : नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये महायुतीतील 'डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन स्वतः मैदानात उतरले आहेत.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र नाशिकमध्ये भाजप आणि महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. या पार्श्वभूमीवर 'डॅमेज कंट्रोल’साठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) स्वतः मैदानात उतरले आहेत. नांदगाव आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि केदा आहेर (Keda Aher) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. आता यावर गिरीश महाजन यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.
गिरीश महाजन म्हणाले की, मी कालपासून नेते आणि पदाधिकाऱ्यांना भेटत आहे. उमेदवारांना भेटलो, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही तक्रारी होत्या त्याबाबत चर्चा करण्यात आली. गरिब कल्याण योजना केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतल्या आहे, याबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. कार्यकर्ते आमदारांमध्ये सुसंवाद झाला, त्यात मार्ग काढला. शहरातील तीन जागा आमच्याच आहेत. जिल्ह्यातील जागा देखील आमच्याच आहेत. मित्र पक्षाचे नेतेदेखील भेटले. आम्ही महायुती म्हणून रणांगणात उतरलो आहोत. मित्र पक्षाचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे.
मी संघाचा, भाजपचा माणूस
महाराष्ट्र सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्र महायुतीला देईल. लोकसभेमध्ये माझा अंदाज होता. मात्र, फेक नरेटिव्ह सेट केला त्याचा परिणाम झाला. मात्र लोकसभेनंतर चित्र बदलले आहे. राजकारणात काहीही होवू शकते, मोठे पद उपभोगून गेले त्यांनी पक्ष सोडले. माझ्या मतदारसंघात ही असेच घडले. ज्यांना पद दिलेत ते सोडून गेले. पण काहीही फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यात कोणती तडजोड केली नाही, मी संघाचा, भाजपचा माणूस आहे, हा पक्ष सर्वोत्तम असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले.
नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत?
नांदगाव विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर चांदवड विधानसभा मतदारसंघात केदा आहे यांनी बंडखोरी केली आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, जिल्ह्यात दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे दिसत आहे. मात्र, अशी कोणती लढत होणार नाही. माघार होईपर्यंत चित्र स्पष्ट होईल, चांदवडमधील केदा आहेर यांच्याशी चर्चा करणार आहे. तर समीर भुजबळ यांच्या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते चर्चा करून निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.
जरांगेंच्या भूमिकेबाबत मला आता बोलायचं नाही
मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी 3 तारखेला उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा केली. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, जरांगे पाटील यांनी 3 तारखेला उमेदवार जाहिर करणार आहेत. तेव्हा मुस्लिम आणि दलित समाज किती सहभागी होतात हे बघावे लागणार आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबत मला आता बोलायचे नाही. निवडणुकीच्या मैदानात कळेल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा