BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत विदर्भातील 23 उमेदवारांना संधी; 8 विद्यमान आमदार अजूनही वेटिंगवर, नेमकं गणित काय?
BJP Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विदर्भातील 23 उमेदवारांना संधी देण्यात आली असून 8 विद्यमान आमदार अजूनही वेटिंगवर आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election 2024 ) भाजपकडून (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, विदर्भातील 23 मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह 19 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर कामठी, देवळी, अचलपूर, आमगाव या उर्वरित 4 ठिकाणी माजी आमदार किंवा इतर इच्छुकांना संधी देण्यात आली आहे. आजच्या यादीत 23 मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असले, तरी विदर्भात भाजपचे आमदार असलेल्या नागपूर मध्य, आर्णी, उमरखेड, गडचिरोली, अकोला पश्चिम, आकोट, मुर्तीजापुर, आर्वी, कारंजा आणि वाशिम या 10 मतदारसंघात भाजपने त्यांचे विद्यमान आमदार असतानाही अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही. ज्या 10 मतदार संघात भाजपचे आमदार असतानाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यापैकी 8 ठिकाणी विद्यमान आमदारांना भाजपने वेटिंग वर ठेवले आहे. तर 2 ठिकाणी भाजपचे आमदार दिवंगत झाले आहे, तिथेही भाजपने आज उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळे तिथे भाजपला नवीन उमेदवार शोधावेच लागणार आहे.
8 विद्यमान आमदार अजूनही वेटिंगवर
आजच्या यादीत फक्त एका विद्यमान आमदाराची टिकीट भाजपने कापली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ज्या कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, त्या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे विदर्भात भाजपचे आमदार असलेल्या 10 मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर केलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, की नवे चेहरे आणले जातील किंवा ते मतदारसंघ मित्र पक्षांकडे जातील हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
विदर्भातील भाजपचे नेमकं गणित काय?
दरम्यान, भाजपने आज विदर्भातील 23 मतदारसंघासाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार आहेत. त्यापैकी भाजपच्या आजच्या यादीत चार आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस, नागपूर पूर्व मधून कृष्णा खोपडे, नागपूर दक्षिण मधून मोहन मते, तर हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे या विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. तर कामठी मतदारसंघात विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची तिकीट कापून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात संधी देण्यात आली आहे. असे असले तरी नागपूर मध्य या मतदारसंघात भाजपचे आमदार असतानाही या यादीत नागपूर मध्य साठीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा