(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपच्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहाव्यांदा संधी; नागपुरातील सहा पैकी चार आमदारांची पुन्हा वर्णी
Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून सलग सहाव्यांदा संधी दिली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पक्षाचे आणि उच्चपदस्थ नेत्यांचे आभार मानले आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election) भाजपकडून (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार आहेत. त्यापैकी भाजपच्या आजच्या यादीत चार आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, नागपूर पूर्व मधून कृष्णा खोपडे, नागपूर दक्षिण मधून मोहन मते, तर हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे या विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. तर कामठी मतदारसंघात विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची तिकीट कापून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात संधी देण्यात आली आहे. असे असले तरी नागपूर मध्य या मतदारसंघात भाजपचे आमदार असतानाही या यादीत नागपूर मध्य साठीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
विद्यमान आमदाराचा पत्ताकट, भाजप प्रदेशाध्यक्षाना संधी
विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या उमेदवारांच्या नावाची अखेर आज भारतीय जनता पक्षाने घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात कामठी मतदारसंघात विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची तिकीट कापून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात संधी देण्यात आली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून सलग सहाव्यांदा संधी दिली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पक्षाचे आणि उच्चपदस्थ नेत्यांचे आभार मानले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहाव्यांदा संधी, पक्षश्रेष्ठींचे मानले आभार
भारतीय जनता पार्टीने मला विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्यांदा संधी दिली. भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी तसेच केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सन्माननीय नेत्यांचा मी नितांत आभारी आहे. पक्षनेतृत्त्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल.
भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्याव्यतिरिक्त आणखी 98 उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा!
अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स वर पोस्ट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.