(Source: Poll of Polls)
Praniti Shinde: प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंविरोधात शिवसैनिक आक्रमक, सोलापूरमध्ये प्रतिमेला जोडेमारो आंदोलन
Solapur News :खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर दक्षिणमध्ये धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले होते.
सोलापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी पार पडली. महाविकास आघाडीमध्ये सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर शहर दक्षिणची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेली होती. शिवसेनेनं इथे अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचा या जागेवर दावा होता मात्र, त्यांना ही जागा मिळाली नव्हती. अखेरच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले. मतदान पार पडल्यानंतर शिवसैनिकांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं.
सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर शहर दक्षिण मध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटलांऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. या मुद्यावरुन शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला वेळीच ठेचून काढावं : शरद कोळी
लोकसभेवेळी प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी बूट चाटण्याचे काम केलं, अशी टीका शरद कोळी यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवाल्यांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे, अशी विनंती करत असल्याचं शरद कोळी म्हणाले.प्रणिती शिंदे तुम्हालाच काय, तुमच्या बापाला देखील आम्ही भीत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, असं शरद कोळी म्हणाले.
शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात फिरून दाखवण्याचं आव्हान देखील दिलं. प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात फिरून दाखवावं, तिच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले. प्रणिती शिंदे नाव घेण्याच्या लायकीची नाही ती विश्वासघातकी आहे, असंही कोळी म्हणाले. गल्लीतल्या मंडळाचे अध्यक्ष होण्याची देखील योग्यता प्रणिती शिंदे यांची नव्हती मात्र उद्धव ठाकरेंमुळे त्यांना खासदार होण्याची संधी मिळाली, असं शरद कोळी म्हणाले.
सोलापूर शहर दक्षिणमध्ये कुणामध्ये लढत?
सोलापूर शहर दक्षिण महायुतीतीत भाजपकडे आहे. भाजपनं या मतदारसंघातून माजी मंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे. तर, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांच्या प्रचारासाठी सभा देखील घेतली होती. तर, धर्मराजा काडादी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस या जागेसाठी प्रयत्नशील होती.
इतर बातम्या :