(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
maharashtra assembly election 2024: विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भाजपची पडद्यामागे जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने विधानसभेचे 85 मतदारसंघ हेरले, बूथनिहाय व्होट मॅनेजमेंट
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अंतर्गत पातळीवर जोरदार तयारी सुरु झाली आहे. महायुतीचे जागावाटप अद्याप पूर्ण झाले नसले तरी भाजपने विनिंग मेरिटच्या आधारे विधानसभा मतदारसंघाची ए, बी, सी अशा तीन विभागात वर्गवारी केली आहे. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabah Election 2024) 105 जागा जिंकल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील बदललेले वातावरण पाहता भाजपने (BJP) जिंकण्याची अधिक हमी असलेल्या विधानसभेच्या 85 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधी रणनीती निश्चित करण्यात आली आहे.
भाजपकडून लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या 85 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. यापैकी काही जागा भाजपने गेल्या निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या जागा धोक्यात असून त्या निवडून आणण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असा सूर भाजपच्या बैठकांमध्ये व्यक्त झाल्याचे समजते. मात्र, धोक्यात असलेल्या काही जागा गमावल्यास गेल्या निवडणुकीत कमी मताधिक्याने गमावलेल्या जागा जिंकून त्याची भरपाई करता येऊ शकते. याशिवाय, गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ज्या जागा कमी फरकाने जिंकल्या होत्या, ते मतदारसंघदेखील यंदा धोकादायक श्रेणीत टाकण्यात आले आहेत.
भाजप आणि संघाचं डेटा ॲनालिसस
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. याचा भाजपला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजपकडून विधानसभेची रणनीती आखताना सुरुवातीपासूनच संघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकांमध्ये सामील करुन घेतले जात आहे. भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी 2014,2019 आणि 2024 लोकसभा या तीन निवडणुकांमध्ये भाजपला झालेले बूथनिहाय मतदान आणि यावेळी किती मते मिळू शकतात, याचा विचार करुन 85 विधानसभा मतदारसंघांची ए,बी, सी अशा तीन कॅटेगरीत विभागणी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत भाजप 155 ते 160 जागांवर उमेदवार उभे करेल, असा अंदाज आहे. त्यापैकी 125 जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने ए,बी,सी कॅटेगरीतील 85 जागा जिंकणे भाजपच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची ही रणनीती कितपत यशस्वी ठरणार, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा
शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मात्तबर नेत्याला तिकीट?