Kailas Patil : अंतरवाली सराटीत लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला? आया बहिणींची डोकी कुणी फोडली?, कैलास पाटलांचा सवाल
Kailas Patil : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कैलास पाटील यांनी प्रचारसभेत बोलताना मोठी घोषणा केली.
धाराशिव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या सभेत कैलास पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. याच सभेतील भाषणाचा समारोप करताना कैलास पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला हे सरकार सांगू शकलं नाही. मराठा आंदोलकांची एसआयटी चौकशी लावण्याचं काम महायुती सरकारनं केल्याचं कैलास पाटील म्हणाले.
कैलास पाटील काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासानं 2019 ला विधानसभेची उमेदवारी दिली. शिवसैनिकांनी दिवस रात्र कष्ट करुन विधानसभेत पाठवलं. तुमच्या विश्वासाला आणि मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सत्ता असेल नसेल मातोश्रीची आणि शिवसैनिकांची साथ सोडणार नाही, असं कैलास पाटील म्हणाले. दबाव आणला किंवा काही केलं तर तुमची साथ सोडणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. आपलं अडीच वर्ष सरकार होतं, कोविडचा काळ होता, धाराशिवचं वैद्यकीय हॉस्पिटल पीपीपी तत्वावर मंजूर झालं होतं. ते तुम्ही शासकीय करुन धाराशिव करांसाठी काम केलं, असं कैलास पाटील म्हणाले.
गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणून महायुती सरकारनं कृष्णा म्हाडोळा योजनेला स्थगिती देण्यात आली, असं कैलास पाटील म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तडवळे येथील स्मारकाची फाईल गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. 8 तासात दहा हजार सह्या करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्या फाईलवर सही का करता आली नाही, असा सवाल कैलास पाटील यांनी केला. धाराशिवला नव्या एसटी बसेस आल्या, कळंब डेपोचं सर्वाधिक उत्पन्न होतं, मात्र विरोधी पक्षाचा आमदार असल्यानं नव्या बसेस दिल्या नाहीत. आपलं सरकार असताना सोयाबीनचा भाव नऊ-दहा हजार रुपयांवर गेला होता. आता या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळं सोयाबीनचा भाव तीन हजारांवर आलाय. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपेल तेव्हा हमीभाव खरेदी केंद्र सुरु केली जातील, असं कैलास पाटील म्हणाले. दूध दर आणि कांदा निर्यातबंदीच्या मुद्यावरुन कैलास पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली.
आपलं सरकार आल्यानंतर कृष्णा माडोळा सिंचन प्रकल्पाचं काम, तेरणा- मांजरा बॅरेजेसच्या कामाला निधी द्यावा, अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या कामाला महसूल मत्र्यांकडन उशीर करण्यात आला. मराठा आंदोलनाच्या तपासासाठी एसआयटी लावण्यात आली. मात्र, आंतरवाली सराटीत लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला याचं उत्तर हे सरकार देऊ शकलं नाही. आपलं सरकार आल्यानंतर लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला. आमच्या आया बहिणींची डोकी कुणाच्या आदेशानं फोडली गेली याचा शोध घेऊन त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे, असं कैलास पाटील म्हणाले.
इतर बातम्या :