Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
Dombivli Assembly Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेची यादी समोर आली. ठाकरेंच्या यादीतील काही नावांवरुन मविआतील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली असताना ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी वेगळा निर्णय घेतला.सदानंद थरवळ यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन नाराजी दर्शवत राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात दीपेश म्हात्रे यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली. या निर्णयावर नाराजी दर्शवत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला.
हेच का निष्ठेचे फळ?
सदानंद थरवळ शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांनी हेच का निष्ठेचे फळ? असा सवाल करत राजीनामा दिला. शिवसेनेत ज्या वेळी बंड झालं होतं त्यावेळी दीपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीची घोषणा जाहीर होण्यापूर्वी दीपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. आता डोंबिवलीतून दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं नाराज असलेल्या सदानंद थरवळ यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
कल्याणमध्ये पहिला धक्का
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आल्यानंतर ठाकरे गटाला कल्याण मध्ये पहिला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याण लोकसभेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला आहे. डोंबिवलीमध्ये सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
सदानंद थरवळ यांनी 2014 साली देखील शेवटच्या क्षणी डोंबिवली विधानसभा लढवण्याची संधी माझ्या हातून गेली होती. त्यावेळेस तुम्ही तुमची चूक मान्य केली होती.पुन्हा दहा वर्षात अनेक राजकीय बदल झाले आणि आता एक तरुण आल्यानंतर त्याला उमेदवारी देण्यात आली. संघर्ष काळात सदैव एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक दुर्लक्षित राहणार असेल तर निष्ठेचा फळ काय? असा सवाल थरवळ यांनी केला.
दरम्यान, डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण हे उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात दीपेश म्हात्रे निवडणूक लढवतील. सदानंद थरवळ यांच्या राजीनाम्यामुळं दीपेश म्हात्रे आणि रवींद्र चव्हाण यांच्या लढतीवर काय फरक पडतो ते पाहावं लागेल.
इतर बातम्या :