Chinchwad Assembly Election 2024 : चिंचवडमध्ये शंकर जगतापांना उमेदवारी, तुतारी चिन्हावर कोण लढणार ठरेना, मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
Chinchwad Assembly Election 2024 : भाजपने पहिल्याच उमेदवार यादीमध्ये चिंचवड मतदारसंघाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात बंजखोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Chinchwad Assembly Election 2024 : चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पण तो गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये गेलेले बहुतांश स्थानिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाकडेच आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप इच्छुक होते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडेही इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून, ही जागा कोणाला मिळणार? यावर अनेक समीकरणे अंवलबून आहेत.
चिंचवड मतदारसंघात कशी आहे परिस्थिती
भाजपने पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या अभिप्रायामध्ये शंकर जगताप एक नंबरवरती आहेत. अश्विनी जगताप दुसऱ्या नंबरवरती व कुठेच चर्चेत नसलेले काळुराम बारणे तिसऱ्या नंबरवरती होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुंटूबात आणि विरोधी दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली होती. भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे व चंद्रकांत नखाते यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
शत्रुघ्न काटे यांनी पक्षात स्वत:चा एक गट निर्माण झाला आहे, तर आता शंकर जगतापांना उमेदवारी मिळाल्यामुळेआता या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्रकांत नखाते वेळप्रसंगी अपक्ष लढवण्याच्याही तयारीत आहेत. भाजप महायुतीची उमेदवारी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना मिळाली आहे. चिंचवडची जागा मविआमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची चिंचवडची उमेदवारी मिळण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे, नाना काटे देखील इच्छुक आहेत. तर ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला मिळाली तर राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असलेल्या राहुल कलाटे यांनी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना चांगली टक्कर दिली होती. पोटनिवडणुकीत देखील कलाटे यांनी जवळपास 45 हजार मत घेतली होती. त्यांच्यामुळे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेले नाना काटे यांचा पराभव झाला. कलाटेंमुळे काटेंची मते फुटली. कलाटे यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली आहे.
राहुल कलाटे यांनी उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार अमोल कोल्हे आग्रही आहेत. दोन वेळा अपक्ष लढून पराभव पत्करलेले राहुल कलाटे यावेळी अपक्ष लढण्याच्या मानसिकतेत नाहीत. ते याबाबत बोलताना म्हणाले होते, मी चिन्हावर निवडणूक लढेन. त्यामुळे ते आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
2019 ला मिळालेले मताधिक्य
लक्ष्मण जगताप - 150723
राहुल कलाटे - 112225