Junnar Vidhansabha election 2024 : अजित पवारांनी पुन्हा बेनकेंना दिली संधी; शरद पवारांकडून नव्या चेहऱ्याला संधी, मतदारांचा कौल महत्त्वाचा
Junnar Vidhansabha election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाने या मतदारसंघात विद्यमान आमदार अतुल बेनके यांना तिकीट दिले असले तरी पुणे जिल्हा हा शरद पवारांचा राजकीय प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो.
Junnar Vidhansabha election 2024 : पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या (Pune Vidhansabha election) 21 जागा आहेत. पुणे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. हा परिसर उद्योगांसाठीही ओळखला जातो. जिल्ह्यातील 21 विधानसभांपैकी जुन्नर ही महाराष्ट्रातील 195 वी विधानसभा आहे. विधानसभा मतदारसंघ परिसीमन पुनर्रचना 2008 मध्ये जुन्नर मतदार संघाची स्थापना करण्यात आली होती. जुन्नर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाने या मतदारसंघात विद्यमान आमदार अतुल बेनके यांना तिकीट दिले असले तरी पुणे जिल्हा हा शरद पवारांचा राजकीय प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो.
जुन्नर मतदारसंघ 1972 पासून आतापर्यंत या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 4 वेळा तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांनी शिवसेनेचे शरद भीमाजी सोनवणे यांचा 9068 मतांनी पराभव केला होता. यावेळी देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अतुल बनके निवडणूक लढवत आहेत.
जुन्नरमध्ये कोणाचं वर्चस्व?
जुन्नर विधानसभेच्या (Pune Vidhansabha election) गेल्या तीन निवडणुकांची स्थिती पाहिली तर 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकदा मनसेने विजय मिळवला असला तरी, गेल्या पाच वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात बरेच बदल झाले आहेत. गेल्या निवडणुकीत अतुल बनके यांनी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. या मतदारसंघात देखील शरद पवारांबद्दल जनतेत सहानुभूतीची लाट निर्माण झाली तर अतुल बेनके यांचा मार्ग अवघड होऊ शकतो. जुन्नरची निवडणूकही उमेदवारावर बरीच अवलंबून राहणार आहे.
उमेदवारांची नावे
महाविकास आघाडीमध्ये (MVA) ही जागा शरद पवारांच्या पक्षाला देण्यात आलेली आहे. शरद पवारांच्या (NCP Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुन्नरचे काँग्रेसचे नेते, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार अतुल बेनके यांना संधी देण्यात आली आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?
2019 च्या निवडणुकीमध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके (Atul Benke) यांनी विजय मिळवला होता. मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शरद सोनवणेंचा पराभव झाला होता. अतुल बेनकेंना 74,958 तर शरददादा सोनवणेंना 65,890 आणि अपक्ष लढलेल्या आशाताई बुचकेंना 50,041 मते मिळाली होती. या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षफुटीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.