मुक्ताईनगर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला, राजकीय क्षेत्रात खळबळ
मुक्ताईनगर (Muktainagar) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे (Vinod Sonawane) यांनी आपल्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा दावा केलाय. यामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Vinod Sonawane : मुक्ताईनगर (Muktainagar) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे (Vinod Sonawane) यांनी आपल्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा दावा केलाय. यामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या संदर्भात विनोद सोनावणे हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात महायुतीकडून आमदार चंद्रकांत पाटील हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून रोहिणी खडसे या उमेदवार आहेत. त्याचबरोबर विनोद सोनावणे हे अपक्ष उमेदवार आहेत. विनोद सोनवने हे बोदवड तालुक्यात राजूर गावात आपल्या वाहनातून प्रचार करत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी आपल्या वाहनांवर गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या असल्या तरी त्या वाहनाला न लागता वाहनाच्या वरुन गेल्याने आपण थोडक्यात बचावल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र हा घातपाताचा करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी दिली आहे. या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी सोनावणे हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हजर झाले असून तक्रार देण्याचे काम सुरू आहे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. राज्यात विविध ठिकाणी राजकीय नेते ऐकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख असतानाही चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत दिली. युतीत हा मतदारसंघ भाजपला सुटला होता. अपक्ष म्हणून लढणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांची सुकन्या रोहिणी खडसे यांचा दारुण पराभव केला आणि विधानसभेत प्रवेश केला होता. आता पुन्हा या मतदारसंघात रोहिणी खडसे यांच्या विरोधात चंद्राकांत पाटील हेच मैदानात उतरले आहे. यावेळी रोहिणी खडसे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आहेत. तर यावेळी चंद्रकांत पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. मागील वेळी ते अपक्ष लढले होते. अशातच विनोद सोनावणे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं मुक्ताईनगर विधानसबा मतदारसंघातील लढत ही तिरंगी होणार आहे.