श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ | तटकरे काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण बाजी मारणार?
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठं राजकीय नाव म्हणजे सुनील तटकरे. मात्र सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आणि विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांच्यातील सत्तासंघर्ष टोकाल गेला आणि अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादीला रामराम करुन नुकतंच शिवबंधन हाती बांधलं. त्यामुळे यंदाची निवडणूक या काका-पुतण्यांसाठी अस्मितेची लढाई ठरणार हे निश्चित.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्त्वाचे बंदर होते. सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते. बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते. श्रीवर्धनचा तीन किमीचा लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो. तसेच अनेक ऐतिहासिक, जुन्या मंदिरांसाठीही हा परिसर ओळखला जातो.
राजकीय स्थिती
नात्यापेक्षा राजकीय अस्मिता मोठी ठरली की काय होतं हे नुकतंच श्रीवर्धन मतदारसंघाने अनुभवलं आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठं राजकीय नाव म्हणजे सुनील तटकरे. मात्र सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आणि विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांच्यातील सत्तासंघर्ष टोकाल गेला आणि अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादीला रामराम करुन नुकतंच शिवबंधन हाती बांधलं. त्यामुळे यंदाची निवडणूक या काका-पुतण्यांसाठी अस्मितेची लढाई ठरणार हे निश्चित. आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सुनील तटकरेंच्या विजयात श्रीवर्धन आणि अलिबाग तालुक्याचे मतदान निर्णायक ठरलं. त्यामुळे संभाव्य उमेदवार असलेल्या सुनील तटकरेंच्या कन्या अदितीला याचा फायदा होऊ शकतो. त्या सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. मात्र अदिती तटकरेंची लढत विद्यमान आमदारांशी असल्याने ही लढत सोपी नक्कीच नाही.
खरंतर श्रीवर्धन हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र 2009 साली सुनील तटकरेंनी इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 2014 ला अवधूत तटकरे निवडून आले. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. मात्र अवधूत तटकरेंच्या शिवसेना प्रवेशानंतर ही समीकरणं बदलू शकतात. बाकी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. भाजपकडून कृष्णा कोनबाक हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. कुणबी अणि मुस्लिम वोटबँक इथे निर्णायक ठरत आली.
मतदारसंघातील समस्या
ग्रामीण भारतातील रोजगाराचा प्रश्न, पिण्याचं पाणी, बेरोजगारी हे या भागातले मोठे प्रश्न आहेत. ऐतिहासिक वास्तू आणि इतर पर्यटन स्थळांकडे आजपर्यंत दुर्लक्षच केलं गेलं. पर्यटनाच्या चांगल्या सोयी केल्यास स्थानिकांना चांगला रोजगार मिळू शकतो.
2014 च्या निवडणुकीतील पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या
अवधूत तटकरे (राष्ट्रवादी) - 61,038 रविंद्र मुंढे (शिवसेना) - 60,961 कृष्णा कोनबाक (भाजप) - 11,215 इब्राहित राऊत (शेकाप) - 5,585 उदय कटे (कॉंग्रेस) - 3,996