एक्स्प्लोर
नांदगाव विधानसभा | पंकज भुजबळांचा रस्ता खडतर, 'वंचित'फॅक्टर महत्वाचा
आमदार पंकज भुजबळांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली असली तरी मतदार संघातील जनतेशी थेट संपर्क नसल्याचा मतदारांचा आरोप आहे. कुठल्याही कामाची अडचण असल्यास स्वीय सहाय्यकाला गाठावे लागत असल्याने नाराजी. त्यामुळे स्थानिक उमेदवारच हवा अशी मतदार संघात चर्चा सुरु.
नाशिक : विधानसभेचे बिगुल वाजताच नांदगाव मतदारसंघात इच्छुकांचे उमेदवारीसाठी हुंकार सुरु झाले आहेत. मतदारसंघात कधी कॉंग्रेस कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी या पक्षांच्या उमेदवारांनी या क्षेत्राचे नेतृत्व केले असून सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळांच्या ताब्यात आहे.
स्वातंत्र्यानंतर सलग सहा वेळा येथून कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केल्याने पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ 1990 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी आपल्याकडे खेचत आमदारकी मिळवली. मात्र 1995 ला युतीच्या लाटेत शिवसेनेने हा मतदार संघ आपल्याकडे खेचत प्रथमच राजेंद्र देशमुख शिवसेना-भाजपा युतीचे आमदार झाले. 2004 पर्यंत हा मतदार संघ युतीच्या ताब्यात राहिला. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसचे अॅड. अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला. 2009 मध्ये मात्र नांदगाव मतदार संघात वेगळाच भूकंप झाला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मतदार संघाची अदलाबदल होऊन हा मतदार संघ राष्ट्रवादीने आपल्याकडे मागवून घेत येथून पंकज भुजबळ यांना उमेदवारी दिली आणि बाहेरचे असूनही या मतदार संघातील जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.
नांदगाव-मनमाड मतदार संघात एकदा निवडून दिलेले आमदार पुन्हा निवडून येत नसल्याचा इतिहास पाहता 2014 मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले. त्याचवेळी शिवसेना-भाजपाची युती होऊ न शकल्याने भाजपने आपला उमेदवार या मतदार संघात उभा केला. तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ यांनी बाजी मारत सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा मान मिळविला आणि एकदा आमदार झाल्याने दुसऱ्यांदा पुन्हा आमदार रिपीट होत नसल्याच्या दावा खोटा ठरविला.
2009 मध्ये आघाडीचे सरकार आणि पंकज भुजबळ यांचे वडील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या येवला मतदार संघात विकास काम करुन मतदार संघाचा चेहरा बदलला. त्यामुळे नांदगाव खुंटलेला विकास पंकज भुजबळ दूर करतील आणि चांगला विकास होईल या आशेवर मतदारांनी त्यांना दोनदा संधी दिली. 2009 ते 2014 या काळात बऱ्यापैकी विकास कामे झाली खरी मात्र त्यानंतर त्याची गती कमी झाली.
2016 मध्ये छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांची सुटका झाली या काळात आमदार पंकज भुजबळांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले. सोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आणि नगरपरिषद निवडणुकीत मनमाडसह नांदगाव नगरपालिका या शिवसेनेच्या ताब्यात गेल्या तर पंचायत समिती झेडपीमध्येही शिवसेनेने बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा नांदगाव-मनमाड मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले.
2019 च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे हे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी मनमाड नपाचे माजी नगराध्यक्ष आणि थेट नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांचे पुत्र गणेश धात्रक हे सुध्दा शिवसेनेचे प्रबळ उमेदवार असू शकतात. त्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे आमदार पंकज भुजबळांच्या कार्यपध्दतीवर नाराज होऊन त्यांच्यापासून दुरावलेल्या अनेक दिग्गजांनी मतदार संघात भूमिपूत्र उमेदवार हवा असा नारा दिल्याने पंकज भुजबळांची डोकेदुखी वाढलीय. तर हा मतदार संघ पुन्हा कॉंग्रेसला मिळावा म्हणून कॉंग्रेसचे प्रयत्न सुरु असून तसे झाले तर माजी आमदार अॅड अनिल आहेर यांची कन्या आणि झेडपीच्या सदस्या अश्विनी आहेर या उमेदवारीच्या दावेदार ठरणार आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीचा फॅक्टर महत्वाचा ठरणार असून वंचितचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास राष्ट्रवादीला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणाच्या कशा आघाड्या होतात यावरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
नांदगाव मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती
नांदगाव मतदारसंघात मालेगाव तालुक्यातील 50 गावांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील एखादा दिग्गज नेता विधानसभेसाठी उमेदवारी करु शकतो आणि त्यासाठी भाजपा जिप सदस्य अर्चना पवार यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
मतदार संघात एकुण 3,02,364 मतदार
महिला मतदार-1,43,871
पुरुष मतदार-1,58,492
2014 साली झालेले मतदान
पंकज भुजबळ-राष्ट्रवादी-69,263
सुहास कांदे-शिवसेना-50,827
अद्वय हिरे-भाजपा-50,351
अनिल आहेर-कॉंग्रेस-16,464
आमदार पंकज भुजबळांची कमजोरी
आमदार पंकज भुजबळांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली असली तरी मतदार संघातील जनतेशी थेट संपर्क नसल्याचा मतदारांचा आरोप आहे. कुठल्याही कामाची अडचण असल्यास स्वीय सहाय्यकाला गाठावे लागत असल्याने नाराजी. त्यामुळे स्थानिक उमेदवारच हवा अशी मतदार संघात चर्चा सुरु.
शिवसेनेची बलस्थानं
मतदारसंघातील 110 ग्रामपंचायती ताब्यात
मनमाड, नांदगाव नपा थेट नगराध्यक्ष आणि पालिकांवर सेनेचे बहुमत
पंचायत समितीत सत्ता, चारपैकी दोन गटात झेडपी सदस्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement