शिवाजीराव सावंतांची भूमिका गुलदसत्यातचं! माढ्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? घडामोडींना वेग
माढ्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत हे महायुतीचं तिकीट न मिळाल्यामुळं नाराज आहेत. ते नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलंय. ते 9 तारखेला त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अशातच माढा विधानसभा (Madha Vidhansabha) मतदारसंघाची राज्यभर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. माढा विधानसभा मतदारसंघात सध्या तिरंगी लढत होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अभिजीत पाटील, महायुतीकडून अजित पवार गटाच्या मिनल साठे तर माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र, या सगळ्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव सावंत हे महायुतीचं तिकीट न मिळाल्यामुळं नाराज आहेत. ते नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. ते 9 तारखेला त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
माढा तालुक्यात शिवाजी सावंतांची भुमिक महत्वाची ठरणार
शिवाजीराव सावंत हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. माढा तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून शिवाजीराव सावंत हे राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहेत. कारखानादारीच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी मोठं जाळ निर्माण केलं आहे. ते सध्या शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम करत आहेत. ते यावेळी माढा विधानभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी दिली नाही. काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली. त्यामुळं शिवाजी सावंत हे नाराज आहेत. त्यामुळं आता शिवाजी सावंत नेमका कोणता निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. कारण माढा तालुक्याचा आमदार होण्यासाठी शिवाजी सावंतांची भुमिक महत्वाची ठरणार आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग माढा तालुक्यात आहे. त्यामुळं सावंत सर हे शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांना पाठिंबा देणार की अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना की अजित पवार गटाच्या मिनल साठे यांना पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिवाजीराव सावंतांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांची धडपड
दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शिवाजीराव सांवत यांच्या भेटीसाठी माढा मतदारसंघात उभे असलेले उमेदवार येत आहेत. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील शिवाजीराव सावंत यांची भेट घेतली आहे. सावंत यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही भेट घेतली आहे. त्याचबरोबर शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी देखील शिवाजीराव सावंत यांची भेट घेतली आहे. त्यांनी देखील पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाच्या उमेदवार मिनल साठे यांनी देखील पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. त्यामुळं आता शिवाजीराव सावंत हे कोणाला पाठिंबा देणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.