Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर सावळागोंधळ; कशाचाच मेळ लागेना, महाराष्ट्रात मतदान नक्की कधी?
Election Commission Press: जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम शनिवारी जाहीर करण्यात आला. यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी कशाप्रकारे तयारी सुरु केली आहे, याची सविस्तर माहिती दिली.
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची आणि उपाययोजनांची जंत्री मांडली. या सगळ्यानंतर राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Loksbaha Election Timetable) जाहीर केले. देशभरात 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होईल आणि 4 जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर कोणत्या राज्यात कधी निवडणूक होणार याबाबतची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी एक नकाशा प्रसिद्ध केला. परंतु, अनेक राज्यांमध्ये एकापेक्षा अधिक टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात तर पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, याची सोपी आणि सुटसुटीत माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांना देता आली नाही. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.
यापूर्वीच्या बहुतांश निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताना प्रत्येक राज्यात कोणत्या तारखेला मतदान पार पडणार, याची माहिती दिली जायची. मात्र, आजच्या पत्रकारपरिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केवळ किती टप्प्यात मतदान पार पडणार आणि निकालाची तारीख किती, एवढ्याच गोष्टी सांगितल्या. याशिवाय, बाकी तपशील सांगण्याची तसदी मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतली नाही. त्यानंतर कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कोणत्या तारखेला मतदान होणार, हे समजून घेण्याची जबाबदारी निवडणूक आयुक्तांकडून संबंधितांवर टाकण्यात आली. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बराचवेळ कोणत्या राज्यात नेमक्या किती तारखेला मतदान होणार, याचाच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने बाकी गोष्टींची कितीही तयारी केली असली तरी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना तरी गोंधळ उडाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रात किती टप्प्यात आणि कोणत्या तारखेला मतदान?
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 4 जूनला निकाल जाहीर होईल. सध्याच्या लोकसभेची मुदत 16 जूनपर्यंत संपत आहे. 6 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीची सगळी प्रक्रिया संपुष्टात येईल. त्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ - 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )
आणखी वाचा
कोणताही उमेदवारी पैसे वाटत असल्यास फक्त एक फोटो पाठवा, निवडणूक आयोग तुमचं लोकेशन स्वत: शोधून काढणार