Bihar: बिहारमध्ये भाजपचं ठरलं, लोकसभेच्या 30 जागा लढणार, 10 मित्रपक्षांसाठी; महाराष्ट्रात शिंदे गटाला काय मिळणार?
Loksabha Election 2024 : बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून 30 जागांवर भाजप निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागांसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप लोकसभेच्या 30 जागा लढवणार असून मित्रपक्षांसाठी 10 जागा सोडण्यात येणार आहेत अशी माहिती आहे. एनडीएचे घटकपक्ष असलेल्या एलजेपीसाठी भाजपने सहा जागा साडण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये भाजपचं जागावाटप अंतिम झालं आहे, मग आता महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाला किती जागा सोडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने एनडीएतील मित्रपक्षांसोबत जागा वाटपाच्या चर्चा सुरू केल्या आहेत. बिहारच्या जागांसाठी आता अंतिम निर्णय झाला असून 40 पैकी 30 जागा भाजप लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर एलजेपीसाठी 6 जागा, जितनराम मांझी यांच्या हम पक्षाला एक जागा, उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाला दोन जागा आणि मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला एक जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी आता कोणत्या जागा कुणी लढवायच्या याचा निर्णय मात्र झालेला नाही. त्या ठिकाणी उमेदवार कोण असेल हे लक्षात घेऊन मित्रपक्षांना जागा सोडण्यात येणार आहेत. यावर बिहार भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या जागावाटपाचं काय?
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढणार आहेत हे नक्की झालंय. त्यामुळे शिवसेना भाजपचा जुना फॉर्म्युला म्हणजे या ठिकाणी लागू होणार की नवीन जागावाटप होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेना शिंदे गटाने शिवसेनेचे 18 खासदार असलेल्या जागांवर दावा केला आहे. त्यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
शिवसेना फुटल्यानंतर 13 खासदार शिंदे गटामध्ये गेले. त्यामुळे आधीच्या म्हणजे 22 जागा शिवसेनेला मिळणार नाहीत, त्यापेक्षा कमी जागा मिळतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपकडून यावेळी जास्तीत जास्त जागा लढवण्यावर भर दिला जाणार आहे. भाजपने शिंदे गटाचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवलीची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचीही चर्चा आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप किती जागा शिवसेना शिंदे गटाला सोडणार हे अद्याप स्पष्ट नाही, किंवा यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.
ही बातमी वाचा :