एक्स्प्लोर
Loksabha Election 2019 : तिसऱ्या टप्प्यात चुरस, राज्यातील 14 लोकसभा मतदारसंघाचा आढावा
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचा समावेश आहे. उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात आहे. देशभरातील 15 राज्यांमधल्या 116 जागांसाठी मतदान होईल.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
या टप्प्यात दोन कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर एक कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात सर्वाधिक (चार) महिला उमेदवार आहेत. पुणे आणि माढा मतदारसंघात सर्वाधिक (प्रत्येकी 31) उमेदवार असून सर्वात कमी (9) उमेदवार सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत.
बारामतीत सुप्रिया सुळेंना कांचन कूल यांचं आव्हान
देशातील प्रमुख लढतींपैकी एक समजल्या जाणाऱ्या बारामती मतदार संघात यंदा सुप्रिया सुळेंसमोर रासप आमदार राहुल कूल यांच्या पत्नी कांचन कूल यांचं आव्हान आहे. खासदार सुप्रिया सुळे या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात त्या रिंगणात उतरल्या आहेत. कांचन कुल या कुल कुटुंबीयांच्या सून असून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील आहेत. बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे सलग दोनदा लोकसभेवर गेल्या आहेत. या मतदारसंघात 10 अपक्ष उमेदवारांसह एकूण 18 जण निवडणूक लढवत आहेत.
2014 मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना 48 टक्के तर जानकर यांना जवळपास 42 टक्के मत मिळाली होती. इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या मतदारसंघांत बारामती मतदारसंघ विभागला गेला आहे. यापैकी दौंड, भोर, इंदापूर तालुक्यात कुल कुटुंबीयांचा प्रभाव आहे.
बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी यंदा भापकडून जोरदार प्रयन्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी बारामतीत प्रचार केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ : श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार
मावळ मतदारसंघातून यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ही लढाई यंदा प्रतिष्ठेची केली आहे.
2014 साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल 5 लाख 12 हजार 226 मतांनी विजयी झाले होते. शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मावळ मतदार लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांनी संपर्क दौरे सुरू केले होते. पार्थ यांना मावळमधून उमेदवारी देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी देखील करण्यात येत होती. त्यानुसार शेवटी पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघातील सहा विधान सभांपैकी पाच विधानसभा शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामध्ये भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. केवळ कर्जत विधानसभेत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, कर्जत या विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे. शेकापकडून पार्थ यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता.
शिरूर लोकसभा मतदारसंघ : शिवाजीराव आढळरावांसमोर अमोल कोल्हे यांचं आव्हान
शिरुर लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. 2008 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आढळराव पाटील शिरूरचं नेतृत्व करत आहेत. 2009 आणि 2014 या दोनही निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला आहे. परंतु यावेळी अमोल कोल्हे यांच्या एंट्रीमुळे शिरूरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल असं बोललं जात आहे.
अभिनेते अमोल कोल्हे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरवातीला शिवाजी महाराज आणि नंतर 'स्वराज्यसरक्षक संभाजी' या भूमिकेतून अमोल कोल्हे घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेचा निवडणुकीत किती फायदा होतो हे येत्या काळात समजेल. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर "स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका संपल्यावर अभिनय करणार नसून लोकांसाठीच पूर्ण वेळ देईन, असं आश्वासन अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ, एकूण सहा विधानसभा क्षेत्र :
जुन्नर
आंबेगाव
शिरूर
भोसरी
खेड आळंदी
हडपसर
सांगली स्पर्धा चांगलीच रंगली
सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला निवडणूक गेल्या निवडणुकीसारखी सोपी राहिलेली नाही. यंदा सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात 12 उमेदवार आहेत. मात्र, खरी चुरस भाजपचे खासदार संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यातच होणार असल्याचे दिसते. सांगली लोकसभा मतदार संघावर 1957 पासून 2009 पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भारतीय जनता पक्षाने ही जागा काँग्रेसच्या हातून खेचून घेतली आणि संजय पाटील हे निवडून आले. काँग्रेसचे उमेदवार वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील यांना 3 लाख 72 हजार 271 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना 6 लाख 11 हजार 563 मते मिळाली होती. 2 लाख 39 हजार 292 मतांनी आघाडी घेत संजय पाटलांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा संजय काका पाटील यांनाच भाजपची उमेदवारी मिळाली आहे. मात्र यावेळी त्यांच्या विरोधात वसंतदादांचेच नातू विशाल पाटलांनी शड्डू ठोकला आहे. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली होती मात्र ही जागा महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटल्याने त्यांनी स्वाभिमानीकडूनच लढण्याचा निर्णय घेतला. सोबतच या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर देखील असल्याने हा सामना चुरशीचा होणार आहे.
कोल्हापुरात मंडलिकांचे पुन्हा महाडिकांना आव्हान
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने संजय मंडलिक यांना तर राष्ट्रवादीने विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होऊन, पूर्वीच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील राधानगरी-भुदरगड तालुक्यांचा समावेश ‘कोल्हापूर’मध्ये झाला. पुनर्रचित मतदारसंघात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी डावलून संभाजीराजे यांना दिली. त्यामुळे मंडलिक यांनी बंडखोरी केली. तिरंगी लढतीत मंडलिक यांनी बाजी मारत कोल्हापूरच्या राजकारणात इतिहास घडविला. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक, शिवसेनेकडून संजय मंडलिक, तर डाव्या आघाडीकडून संपतराव पवार रिंगणात राहिले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाडिक यांनी ती परतावून लावत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला टिकवून ठेवला. आता सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे आहेत. बहुजन वंचित आघाडीने अरुणा माळी यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापुरात एकूण 15 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महाडिक-मंडलिक यांच्यातच आहे. 23 एप्रिलला येथे मतदान होणार आहे. 2014 निवडणुकीचा निकालात धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा 33,542 मतांनी पराभव केला होता.
हातकणंगलेत राजू शेट्टी आपला गड राखणार?
हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यासमोर यंदा भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचे प्रमुख आव्हान आहे. हातकणंगले मतदारसंघासाठी १७ उमेदवार मैदानात आहेत. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी देखील यावेळी लोकसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. नितीन भाट हे देखील किती मतं घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टी शिवसेना-भाजपच्या महायुतीसोबत होते. त्यावेळी राजू शेट्टींविरोधात काँग्रेसने कल्लाप्पा आवाडे यांना तिकीट दिलं होतं. राजू शेट्टींना त्यांचा पराभव केला होता. यंदा ते महाआघाडीसोबत असून त्यांच्यासमोर यंदा धैर्यशील माने यांचं आव्हान आहे. धैर्यशील माने हे पहिलीच लोकसभा निवडणूक लढत आहेत. मात्र त्यांची राजकीय पार्श्वभूमीवर मोठी आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना 4,81,025 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना 3,85,965 मतं मिळाली होती. 2014 च्या लोकसभेत राजू शेट्टी यांना 6,40,428 मतं मिळाली होती, काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांना 4,62,618 मतं मिळाली होती.
पुण्यात यंदा जोशी विरुद्ध बापट सामना रंगणार
पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात लढत होत आहे. 2014 साली भाजपचे अनिल शिरोळे पुण्यातून काँग्रेसच्या विश्वजित कदमांविरोधात 3 लाख 15 हजार 769 मतांनी निवडून आले होते. परंतु भाजपने यावेळी शिरोळेंना पुन्हा संधी दिलेली नाही. पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याबाबत गोंधळ सुरू असताना भाजपने पालकमंत्री गिरीश बापटांना उमेदवारी देऊन पुणेकरांपुढे नवा पर्याय ठेवला. काँग्रेसकडून ही निवडणूक कोण लढवणार याबद्दल बरीच चर्चा झाली होती. गिरीश बापटांपुढे काँग्रेस कोणाला उमेदवारी देतं याबद्दल अनेक आखाडे बांधले जात होते परंतु शेवटी मोहन जोशी यांचे नाव फायनल करण्यात आले.
प्रचारादरम्यान पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न या मुद्द्यांवर नागरिकांनी दोन्ही प्रमुख उमेदवारांना घेरलेले दिसले. गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यासह एकूण 31 जण पुण्यातून निवडणुकीला उभे आहेत. त्यापैकी 15 जण अपक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून अनिल नारायण जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ, एकूण सहा विधानसभा क्षेत्र :
वडगावशेरी
शिवाजीनगर
कसबा पेठ
कोथरूड
पर्वती
पुणे केन्टोन्मेंट
औरंगाबादमध्ये चौरंगी लढत, बालेकिल्ल्यात चंद्रकांत खैरेंचं अस्तित्व पणाला
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे पाचव्या वेळेस बाजी मारत इतिहास घडवणार का ही चर्चा चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. मात्र चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहिलं आहे. मतदारसंघात अनेक राजकीय बदल झाले आहेत.
यंदा औरंगाबादमध्ये चौरंगी लढत होते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून सुभाष झांबड तर वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील मैदानात आहेत. तसेच मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवसुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, त्यामुळेच औरंगाबादची लढत चुरशीची होईल असं बोललं जात आहे.
2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात 61.85 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 89 हजार 395 मतदारांपैकी 9 लाख 83 हजार 57 मतदारांनी मतदान केलं. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं पडली होती तर काँग्रेसच्या नितीन पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं पडली होती. खैरे 1 लाख 62 हजार मतांनी जिंकले होते.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, एकूण सहा विधानसभा क्षेत्र
औरंगाबाद (पूर्व)
औरंगाबाद (पश्चिोम)
औरंगाबाद (मध्य)
गंगापूर
वैजापूर
कन्नड
अहमदनगरच्या प्रतिष्ठेच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. अहमदनगरमध्ये ही निवडणूक सुजय विखेंच्या बंडामुळे प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटील यांना नगरकर काय कौल देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपला मुलगा सुजय विखेंसाठी अहमदनगरमध्ये प्रचारात उतरल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. सुजय विखे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांच्यासोबत मुख्य लढत होणार आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर आव्हाड यांचं आव्हानंही सुजय विखेंसमोर असेल. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत 62.75% मतदान झालं होतं. 2014 मध्ये भाजपकडून दिलीप गांधी आणि राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांच्यात मुख्य लढत झाली होती. त्यावेळी भाजपच्या दिलीप गांधी यांनी राजीव राजळे यांना पराभूत करत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या वर्षी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकीट न देता काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी कडून सुधाकर आव्हाड आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर हे देखील निवडणूक लढवत आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात येणारी विधानसभा क्षेत्र
1- राहुरी विधानसभा
2- पारनेर विधानसभा
3- श्रीगोंदा विधानसभा
4- नगर विधानसभा
5- पाथर्डी-शेवगाव विधानसभा
6- कर्जत-जामखेड विधानसभा
जालन्यात पुन्हा रावसाहेब दानवेंची परीक्षा
जालना मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. तर आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसने या जागेवर विलास औताडे यांना उमेदवारी दिली आहे. मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने महेंद्र कचरु सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर शरदचंद्र वानखेडे जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. दहा अपक्ष उमेदवार देखील जालना मतदारसंघात आपले नशीब आजमावत आहेत. जालना मतदारसंघात एकूण सोळा उमेदवार उभे असले तरी या मतदारसंघात खरी स्पर्धा ही काँग्रेस आणि भाजप मध्येच रंगणार आहे. जालन्याची जागा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली असली तरी रावसाहेब दानवे यांना सध्या खासदार असूनही पुन्हा एकदा ही जागा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जालन्याची जागा मागितली होती शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर जालन्याच्या जागेवर लोकसभेचे तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. परंतु अनेक चर्चा आणि समजुतीनंतर भाजपकडून दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा पराभव केला होता दानवे यांना पाच लाख 91 हजार 428 मते मिळाली होती तर औताडे यांना तीन लाख 84 हजार 630 मते मिळाली होती. जालन्यात एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. त्यापैकी पैठण आणि जालना या दोन विधानसभांमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत तर बदनापूर, भोकरदन, फुलंब्री या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.
जळगावात भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका बसणार?
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीत प्रमुख लढत आहे. राष्ट्रवादीकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर तर भाजपकडून आमदार उन्मेष पाटील हे रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या देखील रिंगणात आहेत. भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांची आधी दाखल केलेली उमेदवारी मागे घेऊन उन्मेष पाटलांना पुढे केले. भाजपतील गटबाजी राष्ट्रवादीचे उमेदवार देवकर यांच्या पथ्यावर पडणार आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले ए. टी. पाटील यांनी राज्यात विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. भाजपला प्रतिकार करणाऱ्या शिवसेनेला काही ठिकाणी आपले अस्तित्व राखता आले आहे. मात्र, मागच्या पाच वर्षात मतदारसंघात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पूर्णत: सफाया झाला. या दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्वही राखता आले नाही. शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्याने दोघांनाही आपापल्या मित्रपक्षांना जागा वाटपानुसार गोंजारण्याशिवाय पर्याय नाही.
जळगाव लोकसभा मतदारसंघ, एकूण सहा विधानसभा क्षेत्र :
1. जळगाव शहर
2. एरंडोल
3. जळगाव ग्रामीण
4. चाळीसगाव
5. अमळनेर
6. पाचोळा
रावेर लोकसभा मतदारसंघात खडसेंची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून जिल्ह्यात 34 लाख 31 हजार 485 मतदार आहेत. रावेर लोकसभा मतदार संघासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 17 लाख 19 हजार 660 पुरुष,16 लाख 39 हजार 732 महिला तर इतर 93 मतदार आहेत. या मतदान केंद्रांवर 26136 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 362 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर, चोपडा, यावल, फैजपूर, सावदा, मुक्ताईनगर, वरणगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा अशा १२ नगरपालिका आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रकाणे 11 मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असणार आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघ, एकूण सहा विधानसभा क्षेत्र :
1. चोपडा
2. जामनेर
3. रावेर
4. मुक्ताईनगर
5. भुसावळ
6. मलकापूर
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंची प्रतिष्ठा पणाला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. शिवसेनेने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीकडून मारुती जोशी, बसपाकडून किशोर वरक, बहुजन मुक्ती पार्टीकडून भिकुराम पालकर, बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीकडून राजेश दिलीपकुमार जाधव आणि चार अपक्ष उमेदवार याठिकाणी निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ राजकीयदृष्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. 2014 साली झालेल्या निवडणुकीचे आकडे आणि यावेळची समीकरणे यात बराच फरक पडला आहे. मात्र 2014 सालच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत दीड लाखांहून अधिकच्या फरकांनी निवडून आले होते. काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा पैकी शिवसेनेचे पाच तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेचं पारडं याठिकाणी जड आहे. मात्र भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेची मतं याठिकाणी निर्णायक ठरणार आहेत. तसेच 2014 मध्ये काँग्रेसची जी मतं निलेश राणेंना मिळाली होती, ती नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या पारड्यात जातील, याचा फटका नितेश राणेंना बसण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये विनायक राऊत यांना 4 लाख 93 हजार 88 मते पडली. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या निलेश राणे यांना 3 लाख 43 हजार 37 मते मिळाली. दीड लाखांहून अधिकच्या मतांनी विनायक राऊत निवडून आले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ
रत्नागिरी
चिपळूण
राजापूर
कणकवली
कुडाळ
सावंतवाडी
शिवसेना राय'गड' राखणार?
रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचं आव्हान असणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सुमन भास्कर यांना याठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. तर बसपाकडून मिलिंद साळवी हे निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आठ अपक्ष उमेदवारही याठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत. रायगड लोकसभेची जागा शिवसेनेची मानली जाते. अनंत गीते याठिकाणी दोन वेळा विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधनं अनंत गीते यांना थोडं जड जाण्याची शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवर सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. ज्यामध्ये अनंत गीतेंनी बाजी मारली होती. अनंत गीते यांना 2014 च्या निवडणुकीत 3,96,178 मतं मिळाली होती, तर सुनील तटकरे यांना 3,94,068 मतं मिळाली होती. तर 2009 मध्ये अनंत गीतेंनी काँग्रेसच्या एआर अंतुले यांचा पराभव केला होता. 2014 च्या लोकसभा मतदार संघातील मतदारापेक्षा 2019 मध्ये मतदारांची संख्या 1 लाखाने वाढली आहे. या वाढलेल्या मतांचा फायदा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघात 8 लाख 3 हजार 72 पुरुष, 8 लाख 34 हजार 766 महिला, एक तृतीयपंथी, 14 एनआरआय तर 1309 सेवा मतदार असे एकूण 16 लाख 39 हजार 162 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
रायगड लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश
पेण
अलिबाग
श्रीवर्धन
महाड
दापोली (रत्नागिरी)
गुहागर (रत्नागिरी)
महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, ओदिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही तेरा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. गुरुवार 23 मे 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे.
तिसरा टप्पा - (115)
आसाम - 4
बिहार - 5
छत्तीसगड - 7
गुजरात - 26
गोवा - 2
जम्मू काश्मिर - 1
कर्नाटक- 14
केरळ - 20
महाराष्ट्र - 14
ओदिशा - 6
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश- 10
पश्चिम बंगाल - 5
दादरा नगर - 1
दमण - दीव - 1
भाजपाध्यक्ष अमित शाह हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले असून गांधीनगरमधून त्यांचा फैसला होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मुलायम सिंह यादव, पप्पू यादव, संबित पात्रा यासारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement