(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उगाच माझं बोट खराब करु नका, शरद पवारांचा मोदींना टोला
माझं बोट धरुन राजकारणात आलो असं सांगून माझं नाव खराब करु नका, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला. जळगाव लोकसभा मतदारसंघात गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी एरंडोल येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी असं बोलले होते की, शरद पवारांचं बोट धरुन मी राजकारणात आलो. मात्र तसं काही नाही, उगाच माझं बोट खराब करु नका, असा टोला शरद पवारांनी लगावला.
जळगावमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मला घरातून बाहेर काढलं अशी टीका मोदींनी केली होती. पण मला घरातून बाहेर काढणारं कोण आहे? माझी मुलगी सासरी आहे, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेच घरात असतो. मग मला घरातून कोण काढणार? ज्यांच्या घरात कुणी नाही त्यांनी मला शिकवू नये की घर कसे चालवावे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की मी शरद पवार यांचा राजकीय वारसा पाहून त्यांचे बोट धरुन राजकारणात आलो आहे. नरेंद्र मोदींनी माझं नाव खराब करु नये. माझं बोट धरुन राजकारणात आलो असं सांगून माझं नाव खराब करु नका, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला.
जळगाव लोकसभा मतदारसंघात गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी एरंडोल येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.