धुळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत, अखेर शोभा बच्छावांनी बाजी मारलीच, सुभाष भामरेंच्या पराभवाची कारणं काय?
Dhule Lok Sabha Election Result 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा 3 हजार 833 मतांनी पराभव केला.
Dhule Lok Sabha Election Result 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) अतिशय अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamare) यांचा 3 हजार 833 मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या विजयामुळे डॉ. सुभाष भामरे यांची हॅट्ट्रिक हुकली.
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची, यावर बराच खल झाला. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर यांना डावलून काँग्रेसने येथून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. बच्छाव यांचा धुळ्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे त्या बाहेरच्या उमेदवार असल्याचा आरोप करीत श्याम सनेर आणि तुषार शेवाळे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. श्याम सनेर यांची समजूत काढण्यात यश आले. मात्र, तुषार शेवाळे यांनी ऐन निवडणूक दोन-तीन दिवसांवर आली असताना भाजपामध्ये प्रवेश केला.
धुळ्यात चुरशीची लढत
निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र नंतर मात्र पूर्ण बदलले. 'एमआयएम'ने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणे, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने आव्हान निर्माण केले होते. भाजपचे डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत झाली. सुरुवातीला डॉ. सुभाष भामरे हे आघाडीवर होते. मात्र, नंतर शोभा बच्छाव यांनी आश्चर्यकारकरीत्या सुभाष भामरे यांच्यावर आघाडी घेतली आणि शोभा बच्छाव यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातून विजय झाला.
धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरेंच्या पराभवाची कारणे
डॉ. शोभा बच्छाव (काँग्रेस) - विजयी
डॉ. सुभाष भामरे (भाजप) - पराभूत
- बागलाण पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी.
- धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होता.
- धुळे मनपात भाजपची सत्ता असून देखील पूर्ण न झालेली विकासकामे.
- मतदार संघात रोजगाराच्या संधी नसणे.
- धुळे शहर आणि मालेगाव मध्यमधील अल्पसंख्याक मतदारांची एकगठ्ठा ताकद काँगेसच्या पारड्यात पडली.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदान
धुळे ग्रामीण
शोभा बच्छाव : 76 हजार 266
सुभाष भामरे : 1 लाख 40 हजार 505
धुळे शहर
शोभा बच्छाव : 88 हजार 438
सुभाष भामरे : 93 हजार 262
शिंदखेडा
शोभा बच्छाव : 68 हजार 424
सुभाष भामरे : 1 लाख 11 हजार 849
मालेगाव मध्य
शोभा बच्छाव : 1 लाख 98 हजार 869
सुभाष भामरे : 4 हजार 542
मालेगाव बाह्य
शोभा बच्छाव : 72 हजार 242
सुभाष भामरे : 1 लाख 27 हजार 454
बागलाण
शोभा बच्छाव : 78 हजार 253
सुभाष भामरे : 10 हजार 166
पोस्टल
शोभा बच्छाव : 1 हजार 374
सुभाष भामरे : 2 हजार 257
एकूण मते
शोभा बच्छाव : 5 लाख 83 हजार 866
सुभाष भामरे : 5 लाख 80 हजार 35
आणखी वाचा