Lok Sabha Election Exit Poll : देशातील 'या' राज्यांचा कल एकतर्फी असणार?, कुठला पक्ष बाजी मारणार, जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज
ABP C Voter Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. या निकालापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) एकूण 543 जागांसठी मतदान 7 टप्प्यांमध्ये पार पडलं. भाजपच्या (BJP) नेतृत्त्वात एनडीएनं (NDA) तर काँग्रेसनं (Congress) विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडी (I.N.D.I.A) स्थापन करत लोकसभा निवडणुकीचा सामना केला. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. मात्र, हे अंदाज असून प्रत्यक्ष निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. 2019 च्या निवडणुकीत ज्या राज्यांनी भाजपला साथ दिली होती. ती राज्यं पुन्हा एकदा भाजपच्या बाजूनं एकतर्फी कौल देत असल्याचा अंदाज एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून (ABP C Voter Exit Poll) समोर आला आहे. भाजपला गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम आणि छत्तीसगड राज्यातून एकतर्फी जागा मिळतील असा अंदाज समोर आला आहे.
गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. त्या जागांपैकी भाजपला 25 ते 26 जागा मिळतील असा अंदाज आहे. राजस्थान राज्यात लोकसभेच्या 25 जागा असून इथं भाजपला काही महिन्यांपूर्वी विधानसभेची सत्ता मिळाली होती. भाजपला लोकसभेला 21 ते 23 जागा मिळू शकतात. राजस्थान प्रमाणं भाजपला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात देखील विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाली होती. यापैकी मध्यप्रदेश राज्यात भाजपला 29 जागांपैकी 26 मिळतील असा अंदाज आहे. मध्यप्रदेशच्या शेजारचं राज्य असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपला 10 ते 11 जागा मिळू शकतील, असा अंदाज एबीपी सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.
कर्नाटकात गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. यावेळी देखील कर्नाटकमधून भाजपला चांगलं यश मिळू शकतं असा अंदाज एबीपी सी व्होटरच्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात भाजपला 28 पैकी 23 ते 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा असून तिथं देखील भाजपला एकतर्फी आघाडी मिळू शकते असा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला आसाममध्ये 10 ते 12 जागा मिळू शकतात. उत्तराखंडमध्ये देखील भाजपला 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशात एनडीएच्या बाजूनं मतदारांचा कौल राहू शकतो. आंध्र प्रदेशमध्ये एनडीएला 21 ते 25 जागा मिळतील असा अंदाज आहे.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडी एकतर्फी यश मिळवताना दिसते. तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत. यापैकी 37 ते 39 जागा द्रमुक आणि काँग्रेसला मिळू शकतात.
Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.
संबंधित बातम्या :
Poll of Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी, सर्व एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा ?