Lok Sabha Exit Poll 2024: महाराष्ट्रात धक्कादायक निकाल? मविआला 25, महायुतीला 22 अन् एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा अंदाज
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध माध्यम संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता.
मुंबई: देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शनिवार संपुष्टात आली. आज देशात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर सर्वांना उत्सुकता असलेले एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी 25 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तर 22 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज आहे. सांगलीतील एका जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा विजय होण्याची शक्यता टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला राज्यातील 41 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळाला होता. हा आकडा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 22 पर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. हा महायुती आणि पर्यायाने भाजपसाठी मोठा धक्का ठरु शकतो. त्यामुळे आता 4 जूनला प्रत्यक्ष निकालात हेच चित्र पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये काय घडणार?
* कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा विजय होऊ शकतो, तर संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकतो.
* चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांची सरशी होण्याची शक्यता, भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर.
* अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या विजयाची शक्यता, भाजपच्या सुजय विखे-पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता
* बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विजयाची शक्यता, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पराभव होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे बाजी मारण्याची शक्यता. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचे विजयाच्या हॅट्रिकचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता.
* उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी होण्याची शक्यता, भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव होण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
* छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांचा पराभव करतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
* सातारा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा पराभव करतील, अशी शक्यता टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविली आहे.
आणखी वाचा