डीके शिवकुमार सव्वा लाखाने तर 'हा' उमेदवार फक्त 105 मतांनी विजयी; जाणून घ्या सर्वाधिक आणि कमी मार्जिनने जिंकणारे उमेदवार
DK Shivkumar : राज्यात सर्वाधिक मताधिक्याने आणि सर्वात कमी मताधिक्याने जिंकण्याचा विक्रम काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावावर आहे.
Karnataka Election Result : नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत अनेक विक्रम झाले आहेत. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबिज केली आहे तर भाजप आणि जनता दलाच्या उमेदवारांचा सुफडा साफ झाल्याचं दिसून आलं. भाजपला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या आहेत. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम काँग्रेसच्या डीके शिवकुमार यांच्या नावावर आहे, तर सर्वात कमी मतांनी निवडून येण्याचा विक्रमही काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावावरच आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले डीके शिवकुमार हे राज्यात सर्वाधिक मतांनी म्हणजे 1.22 लाख मतांनी निवडून आले आहेत, तर सर्वात कमी मताधिक्य काँग्रेसच्या दिनेश गुंडू राव यांच्या नावावर असून ते फक्त 105 मतांनी निवडून आले आहेत.
सर्वाधिक मताधिक्य असलेले टॉपचे उमेदवार
- कनकपुरा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार डीके शिवकुमार 1 लाख 22 हजार 392 मतांनी विजयी झाले. त्यांना एकूणातील 75 टक्के म्हणजे 1 लाख 43 हजार 23 मतं पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी जनता दल सेक्युलरच्या उमेदवाराला 20 हजार 631 आणि भाजपच्या उमेदवाराला 19 हजार 753 मतं पडली.
- चिक्कोडी सदलगा मतदारसंघातून काँग्रेसचे गणेश हुक्केरी 78 हजार 509 मतांनी विजयी झाले.
- पुलकेशीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे एसी श्रीनिवास 62 हजार 210 मतांनी विजयी झाले.
- कोल्लेगल मतदारसंघात काँग्रेसचे एआर कृष्णमुर्ती 59 हजार 519 मतांनी विजयी झाले.
- यमकनमर्डी मतदारसंघात सतिश जारकीहोळी 57 हजार 211 मतांनी विजयी झाले.
- बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर 56 हजार 16 मतांनी विजयी झाल्या.
- बसवनगुडी मतदारसंघातून भाजपचे रवी सुब्रमण्य 54 हजार 978 मतांनी विजयी
- चित्रदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या केसी विरेंद्र पप्पी 53 हजार 300 मतांनी विजयी झाले.
सर्वात कमी मताधिक्य मिळवणारे उमेदवार
- गांधीनगर मतदारसंघात काँग्रेसचे दिनेश गुंडु राव फक्त 105 मतांनी विजयी झाले. त्यांना 54 हजार 118 मतं पडली तर भाजपच्या सप्तगिरी गौडा यांना 54 हजार 13 मतं पडली. इथे नोटाला 1692, जनता दल सेक्युलरला 12 हजार 857 मतं पडली.
- श्रींगेरी मतदारसंघात काँग्रेसचे टीडी राजेगौडा 167 मतांनी विजयी झाले. त्यांना 59 हजार 30 मतं पडली. तर भाजपच्या जीवराजा यांना 58 हजार 863 मतं पडली. इथे नोटाला 678 मतं पडली तर 9 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त पडली.
- मालूर मतदारसंघात काँग्रेसचे के वाय नान्जेगौडा 248 मतांनी विजयी झाले. त्यांना 57 हजार 591 मतं पडली तर भाजपच्या सी के राममूर्ती यांना 57 हजार 297 मतं पडली. इथे नोटाला 647 मतं पडली तर एका अपक्ष उमेदवाराला 49 हजार 362 पेक्षा जास्त मतं पडली.
- जयानगर मतदारसंघात काँग्रेसच्या सौम्या रेड्डी 294 मतांनी विजयी झाले. त्यांना 50 हजार 955 मतं पडली तर भाजपच्या के एस मंजुनाथगौडा यांना 50 हजार 707 मतं पडली. इथे नोटाला 1984 मतं पडली तर चार उमेवारांना 300 पेक्षा जास्त मतं पडली.
- चिंचोली मतदारसंघात भाजपचे अविनाश उमेश जाधव 858 मतांनी विजयी झाले. अविनाश जाधव यांना 69 हजार 963 मतं पडली तर काँग्रेसच्या सुभाष राठोड यांना 69 हजार 105 मतं पडली. इथे नोटाला 1003, तर जनता दल सेक्युलरच्या उमेदवाराला 6 हजार 555 मतं पडली.
- जगलूर मतदारसंघात काँग्रेसचे देवेंद्रप्पा 874 मतांनी विजयी झाले. त्यांना 50 हजार 765 मतं पडली तर भाजपच्या एस व्ही रामचंद्र यांना 49 हजार 891 मतं पडली. इथे नोटाला 1996 तर एका अपक्ष उमेदवाराला 49 हजार 442 मतं पडली.
या बातम्या वाचा :
- DK Shivakumar : अब्जावधीची संपत्ती, भ्रष्टाचाराचाही आरोप... आता मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर; कोण आहेत कर्नाटक 'काँग्रेसचे संकटमोचक' डीके शिवकुमार?
- Karnataka Election: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा उद्याच फैसला? डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांना दिल्लीला बोलावलं
- Karnataka Election: मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार, सिद्धारमय्या यांच्यासोबत आता मल्लिकार्जुन खर्गेही शर्यतीत, अनपेक्षितपणे नाव आलं पुढे