Karnataka Assembly Election 2023: बसवराज बोम्मई, सिद्धरामय्या अन् डीके शिवकुमार... मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नंबर 1 कोण? सर्वेक्षणातून मोठा निष्कर्ष
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आठवडाभर आधी आलेल्या आणखी एका सर्वेक्षणाचे निकाल धक्कादायक आहेत. मुख्यमंत्री म्हणून कोणाला सर्वाधिक पसंती? याबाबत जनतेचा कौल देण्यात आला.
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) जवळपास एक आठवडा शिल्लक आहे. निवडणुकीपूर्वी जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ताज्या निवडणूक सर्वेक्षणाच्या आकडेवारीत, कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंतीचा चेहरा कोण? यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी विराजमान कोण होणार? तसेच, या शर्यतीत कोण आहे? यासंदर्भातही सर्वेक्षणातून जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. हे सर्वेक्षण CSDS ने NDTV साठी केलं आहे. जाणून घेऊया सर्वेक्षणात जनतेनं कोणाला कौल दिला त्याबाबत...
सर्वेक्षणानुसार, कर्नाटकातील पुढील मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) सर्वाधिक पसंतीचे नेते आहेत. तर, विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांना दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जुन्या मतदारांमध्ये सिद्धरामय्या हे बोम्मई यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असले तरी सध्याचे मुख्यमंत्री हे नव्या मतदारांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा पुढे आहेत.
मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कोणाला?
(18 ते 25 वयोगटातील लोकांमध्ये)
- सिद्धरामय्या : 40 टक्के
- बसवराज बोम्मई : 28 टक्के
56 वर्षांवरील लोकांमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला अधिक पसंती आहे?
- सिद्धरामय्या : 44 टक्के
- बसवराज बोम्मई : 22 टक्के
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील इतर चेहरे कोण? कोणाला मिळाली पसंती?
- एचडीकुमार स्वामी : 15 टक्के
- बीएस येदियुरप्पा : 5 टक्के
- डीके शिवकुमार : 4 टक्के
सर्वेक्षणानुसार, जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तिसरे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे बीएस येडियुरप्पा आणि काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचा क्रमांक लागतो.
विशेष म्हणजे, एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरनं नुकत्याच केलेल्या ओपिनियन पोलमध्ये सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बसवराज बोम्मई यांच्यापेक्षा पुढे होते. या ओपिनियन पोलमध्ये 41 टक्के लोकांनी सिद्धरामय्या यांना 'मुख्यमंत्री' पसंती दिली होती. बसवराज बोम्मई यांना 31 टक्के लोकांनी पसंती दिली. 22 टक्के लोकांनी एचडी कुमारस्वामी यांच्या बाजूनं कौल दिला होता. 3 टक्के लोकांनी डीके शिवकुमार यांचं नाव घेतलं होतं.
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी कोणाला पसंती?
(स्रोत- सी-व्होटर)
- बसवराज बोम्मई : 31 टक्के
- सिद्धरामय्या : 41 टक्के
- एचडी कुमारस्वामी : 22 टक्के
- डीके शिवकुमार : 03 टक्के
- अन्य : 03 टक्के
दरम्यान, 10 मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बहुतांश जनमत चाचण्या आणि सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसून आला आहे. मात्र, भाजप राज्यात पुन्हा सत्तेत येईल, असा दावा करत आहे. दुसरीकडे, काँग्रेसला या वेळी सत्तेत येण्याची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षांकडून राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे.