Mahayuti Government: गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाच्या नेत्याने शड्डू ठोकला
Mahayuti Government: राज्यातील मुख्यमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शर्यत कायम? एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपद मागितलं, भाजप काय करणार?
मुंबई: राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असले तर गृहमंत्रीपद आमच्याकडे असावे, हा नैसर्गिक नियम आहे. ते खातं आमच्याकडे असायला हरकत नाही. गृहखात्यावर एखादा डॅशिंग नेता असायला पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गृहखाते शिवसेनेला मिळण्याबाबत अजूनही ठाम असल्याचे संकेत मिळत आहे. अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे सगळ्या राजकीय घडामोडींपासून अलिप्त होत साताऱ्यातील आपल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे महायुतीच्या खातेवाटपाची बैठक लांबवणीवर पडली आहे. अशातच आता संजय शिरसाट यांनी शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क असल्याचा दावा केला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय शिरसाट यांनी अर्थखात्याबाबतही टिप्पणी केली. जे देतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. लाडकी बहीण योजना जाहीर करताना अर्थ खात्याने थोडा विरोध केला होता. 1500 ते 2100 करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मान्यता मिळाली हवी. या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
विरोधकांच्या हातात आता सामूहिक आत्महत्या करण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्यापेक्षा महाराष्ट्रात खास करून गावी दरेला जातात, तिथून आल्यानंतर पक्षासाठी योग्य तो निर्णय घेतात. ईव्हीएमबाबत जे प्रश्न उपस्थित करत आहेत, तो त्यांचा पराभवानंतरचा केविलवाणा प्रयत्न आहे. राम शिंदेबाबत बोलायचं झालं तर कर्जत जामखेडमध्ये दमदाटीचं राजकारण झालं. शरद पवार ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करत आहेत. एकदा पावसात भिजल्याने सत्ता आली. वारंवार भिजल्याने येतेच अशी नाही, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.
मुख्यमंत्री कोण याचा निर्णय भाजपने घ्यावा: संजय शिरसाट
राज्याचा मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर अद्याप कोणालाच सापडलेलं नाही. मुख्यमंत्री दरे गावी जात असतात. मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगाव त्यांचं आवडीचं ठिकाण आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी परखडपणे सांगितलं आहे की, सरकार स्थापन करण्यात माझा अडसर नाही. वरिष्ठ नेत्यांचा निर्णय पक्ष आणि मी बांधील असल्याचं स्पष्ट वक्तव्य केलं आहे . दिल्लीतील बैठकीत देखील त्यांनी ते सांगितलं आहे. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणाला मुख्यमंत्री करावं हा निर्णय मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा. का वेळ लागतोय याची कल्पना नाही.
परिवर्तन होत तेव्हा मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर खातेवाटपावर चर्चा होते. काही विद्वान सरकारवर टीका करत आहेत. अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, सरकार वाऱ्यावर सोडलेलं नाही. सोमवारी भाजपचे निरीक्षक येणार आहेत, असे समजते. शिंदे का दरेगावला गेले याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही लाचारसारखं नाटकं करणारी लोक नाही. आमची नाराजी आम्ही उघडपणे जाहीर करु. लाचारीत ज्यांनी अडीच वर्ष घालवली, त्यांच्या टीकेत काही अर्थ नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
आणखी वाचा