(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar: शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Maharashtra Politics: जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव झाला होता. या पराभावाची प्रचंड चर्चा सुरु आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडून कल्याण काळेंचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर: माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्यादिवशी एकनाथ शिंदे यांचा माझ्यावरचा विश्वास संपेल, त्यादिवशी मी योग्य निर्णय घेईन, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. जालना लोकसभा (Jalna Lok Sabha) मतदारसंघात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा दारुण पराभव झाला होता. जालना लोकसभेत अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना मताधिक्य मिळू शकले नव्हते. सिल्लोड मतदारसंघातील महायुतीची कामगिरी चर्चेचा विषय ठरली होती. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले.
यावेळी अब्दुल सत्तार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. मी एकनाथ शिंदे यांचा विश्वासू आहे. आमचे संबंध चांगले आहेत. 2019 मध्ये जे घडलं होतं त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे होते. त्यावेळी ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते. माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी योग्य तो निर्णय घेईन, असे सत्तार यांनी म्हटले. सत्तारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
माझ्या नावात सत्तारमध्ये सत्ता आहे. मी म्हणालो होतो संदिपान भुमरे आणि दानवे जिंकणार. मी 5 लाखाची शर्यत लावली होती आणि जिंकली. खैरे यांनी आपल्याच पक्षाच्या लोकांवर विश्वास ठेवला. रावसाहेब दानवे माझे जवळचे मित्र आहेत, पण हृदयातील मित्र काळे आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.
सिल्लोडमध्ये रावसाहेब दानवेंना कमी मतं का पडली? अब्दुल सत्तार म्हणाल्या...
राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र राहत नाही. दानवे यांना भोकरदनमध्ये देखील मते मिळाली नाहीत. जालन्यात यंदा मनोज जरांगे फॅक्टरचा प्रभाव होता. आमचे कार्यकर्ते यावेळी नाराज होते, रावसाहेब दानवे यांना मी तसे बोलून दाखवले होते. आम्हाला शत्रू म्हणणाऱ्या लोकांनी पैठणमधून किती मतदान आहे हे पाहावे. दानवे यांना कमी मतं पडण्याची अनेक कारणं आहेत. जरांगे यांनी दानवे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मी रावसाहेब दानवे यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या. 17 सभा सिल्लोडमध्ये घेतल्या, पण आमचे कार्यकर्ते नाराज होते. माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केली, हे मी मान्य करतो. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनादेखील मी माहिती दिली होती. मी नाही तर आमचे काही कार्यकर्ते दानवे यांच्या विरोधात गेले हे प्रामाणिकपणे कबूल करतो. मला विधानसभेला त्यांनी मदत न केल्याची भावना त्यांच्यामध्ये होती, असे अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवले.
अब्दुल सत्तारांची कल्याण काळेंना मिठी, नव्या समीकरणाची चर्चा
अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचा सत्कार केला. जवळचे मित्र म्हणून मी त्यांना मिठी मारली. काळे म्हणतात त्यांनी युतीचा तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मैत्रीचा धर्म निभावला. या मिठीत नव्या राजकारणाची नांदी आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.
आणखी वाचा
अखेर रावसाहेब दानवे हरले, अब्दुल सत्तारांची प्रतिज्ञा पूर्ण, 1 लाख लोकांसमोर टोपी उतरवणार!
कल्याण काळे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते यांच्यासह राज्यातील 17 जायंट किलर्स, ज्यांनी बदललं राजकारण