Himachal Election Results 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसला 'ऑपरेशन लोटस'ची भीती, आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवणार?
Himachal Assembly Election Results 2022: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा यांच्यावर आमदारांना राजस्थानला हलवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Himachal Assembly Election Results 2022: हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकीचा (Election 2022) निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीतील सुरुवातीच्या कलांनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई दिसत आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा (Himachal Assembly Election) निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी काँग्रेसला (Congress) घोडेबाजार होण्याची भीती वाटत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला घोडेबाजाराची भीती वाटतेय. भाजप विजयी उमेदवार फोडू शकतो या भितीनं धास्तवालेल्या काँग्रेसनं उमेदवारांना राजस्थानमध्ये (Rajasthan) हलवण्याची तयारी सुरु केली आहे. 'ऑपरेशन लोटस'ची शंका आल्यानं काँग्रेसनं हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला पाठवण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रियंका गांधींचं लक्ष
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्या आज शिमल्यात जाण्याची शक्यता आहे. आज निवडणुकीच्या निकालानंतर जनता पुन्हा भाजपला संधी देणार की काँग्रेसची सत्ता कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हिमाचलमध्ये कोणाचं सरकार?
हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी राज्यातील 55 लाख मतदारांपैकी सुमारे 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हिमाचल प्रदेशमध्ये 68 सदस्यीय विधानसभा आहे. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात होते, त्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. काँग्रेसला आपल्या विजयाची खात्री असताना भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे.