गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात 40 वर्षानंतर पहिल्यांदाच या विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ हे चिन्ह नसणार आहे.
मुंबई : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे म्हटलं की भाजप आणि भाजप म्हटलं की गोपीनाथ मुंडे हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून होते. त्यामुळेच, परळी मतदारसंघात भाजपचं वर्चस्व गेल्या 40 ते 45 वर्षांपासून अबाधित होते. स्वत: गोपीनाथ मुंडेंनी याच मतदारसंघातून आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढली आणि जिंकली. त्यानंतर, गोपीनाथ मुंडेंच्या (Gopinath munde) निधनानंतर पंकजा मुंडेंनी त्यांचा राजकीय वारसा चालवला. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला. त्यामध्ये, राष्ट्रवादीच्या चिन्हावर धनंजय मुंडेंनी विजय मिळवला. त्यामुळे, पहिल्यांदाच 2019 मध्ये भाजपचे (BJP) कमळ येथील मतदारसंघात पराभूत झाले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत येथे कमळाचे चिन्हच निवडणुकीत असणार नाही. त्यावरुन, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपला परळी मतदारसंघात प्रचार करण्याचा नैतिक अधिकारच उरला नाही. कारण, ज्या गोपीनाथ मुंडेंनी 45 वर्षांपूर्वी कमळ खुलवलं, त्या परळीत यंदा कमळाचं चिन्हच नसणार असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले,
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात 40 वर्षानंतर पहिल्यांदाच या विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ हे चिन्ह नसणार आहे. कारण धनंजय मुंडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढणार आहेत. महायुतीमध्ये सहयोगी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी लढवत असल्याने भाजपाला या ठिकाणी उमेदवार नसणार आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी 40 वर्षात पहिल्यांदाच कमळाविना मतदान करावे लागणार आहे. या निवडणुकीमध्ये कमळ चिन्ह नसण्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यावरुन, मनेसेच्या प्रकाश महाजन यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपला नैतिक अधिकारच उरला नाही, अशा शब्दात त्यांनी परळी मतदारसंघातून भाजपचे कमळ गायब झाल्याने खंत व्यक्त करत भाजप नेत्यांवर टीका केलीय.
1980 साली कमळ खुलले
1980 साली भाजपची स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा याच विधानसभेत कमळ खुललं. तेव्हापासून 2019 पर्यंत येथे कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यात आली आहे. मात्र, 2024 साली यंदा पहिल्यांदाच कमळ चिन्ह नसणार आहे. परळी, रेणापूर किंवा बीड लोकसभा निवडणुकीत आम्हाला कमळ हे चिन्ह सातत्याने दिसायचं, पण यंदा दिसणार नाही. गोपीनाथ मुंडेंनी परळीतून महाराष्ट्रात कमळ पोहोचवलं, मात्र यंदा तेच कमळ चिन्ह येथील निवडणुकीत नसल्याने भाजप समर्थक नाराजी झाले आहेत.
पंकजा मुंडेंनी चालवला वारसा
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ राज्यात नेहमीच चर्चेत राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात फूट पडल्यानंतर चर्चा होती परळीचे आमदार धनंजय मुंडेंची. कारण, यंदा मुंडेंच्या परळीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. त्यामुळे, यंदा प्रथमच गोपीनाथ मुंडेच्या परळीमध्ये कमळ चिन्ह नसणार याचीही खंत काही मतदारांमध्ये आहे. परळी हा गोपीनाथ मुंडे यांचा गड मानला जात होता. मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी त्यांची राजकीय वारस म्हणून मुलगी पंकजा मुंडे यांना 2009 मध्ये परळीतून विधानसभेवर निवडून आणले. त्यामुळे, 2009 पासून धनंजय मुंडेंची भाजपात कोंडी झाल्याने 2013 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून परळीत पकंजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला आणि तुतारी चिन्हावर बजरंग सोनवणे विजयी झाले. त्यानंतर पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागली अन् परळी विधानसभेचा मार्ग धनंजय मुंडेंसाठी मोकळा झाला. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार आहेत. तर, विरोधी महाविकास आघाडीतील उमेदवार तुतारी चिन्हावर आहे. यंदा प्रथमच परळीमध्ये कमळ चिन्ह नसणार आणि गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारस पंकजा मुंडेही उमेदवार नसणार आहेत. त्यामुळे, कट्टर भाजप समर्थका नाराज झाले असून कोणाला मतदान करावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर पडल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी