(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election : राज्यात लवकरच निवडणुकीचं बिगुल वाजणार, कधी आणि कशा होतील निवडणुका?
राज्यात निवडणुकांचे वेध लागले आहेत. पण कोणत्या महापालिका आणि जिल्हा परिषदा आहेत? या निवडणुका कशा आणि कधी होऊ शकतात? सर्वच निवडणुका एकत्र होणार आहेत का?
मुंबई : घोषणाबाजी, राजकीय सभा, नेत्यांचे आरोप प्रत्यारोप यासगळ्यांनी महाराष्ट्र निवडणुकांच्या रंगात रंगून जाणार आहे. ओबीसी आरक्षण आणि कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका लवकरच होणाची शक्यता आहे, तशी तयारी आता निवडणुक आयोग करत आहे. राज्यातील अनेक महापालिकांच्या मुदत संपल्या आहेत. या महापालिकांच्या मुदत संपल्याने त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. या महापालिकांची मुदत संपल्याने तिथे तातडीने निवडणुका घेण्याची गरज आहे. त्यात आता ओबीसी आरक्षण प्रकरणी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 15 दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे.
एकूण 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणं बाकी आहेत. दोन वर्षानंतर एकत्र आलेल्या निवडणुका एकाच वेळी घेणं सोपं नाही. त्यामुळे या सर्व निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत असल्याची माहिती आहे.
- राज्यातील नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या महापालिकांची मुदत संपली आहे.
- पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणूक घेतली जाणार आहे.
- नुकत्याच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणुक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
- औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकांची मुदत 2020 मध्येच संपली आहे.
- मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी -चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर या महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मार्च महिन्यात संपला आहे.
- 2022 मार्च महिन्यात ज्या महापालिका ची मुदत संपलेली आहे त्याठिकाणी देखील आता दोन चार महिने उलटून गेले आहेत.
17 मे रोजी प्रभागरचना जाहीर होणार असून त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाईल. आरक्षण सोडतीनंतर हरकती आणि सूचना तसेच 33 प्रभागांसाठी तयार केलेल्या विभाजित मतदारयाद्यांची प्रसिद्धी व त्यावर हरकती व सूचनांचा कार्यक्रम जाहीर होईल. या सर्व प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता दाट आहे. त्यात पावसाचे दिवस येत आहे, त्यामुळे निवडणुका एक तर पावसात किंवा पावसाळ्यानंतर होऊ शकतात.
या निवडणुकांवर अनेकांची राजकीय नेत्याचं भवितव्य ठरणार आहे. विधानसभेआधी होत असलेल्या या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज आहेत आणि निवडणुकांची वाटही पाहत आहेत.
2019 नंतर महाराष्ट्रातलं बरंच राजकारण बदललं आहे. अनेक नेते जेल, पोलीस स्टेशनची वारी करत आहेत. मनसे आणि भाजप राज्यात आक्रमक भूमिका घेत आहेत तर महाविकास आघाडी देखील तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊन हल्ले परतवून लावत आहेत. महापालिकांमध्ये युती आघाडीचे धर्म पाळतील की नाही माहित नाही पण या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष एकमेकांवर तुटून पडणार आहेत एवढं नक्की.