Assembly Elections Results 2023: त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात कमळ फुलणार की, काँग्रेस बाजी मारणार? आज निकाल
Election Results 2023 UPDATES: त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात कमळ फुलणार की, काँग्रेस बाजी मारणार? आज निकाल जाहीर होणार आहे.
Election Results 2023 LIVE UPDATES: ईशान्येकडील तीन राज्यांसाठी, 2 मार्च म्हणजे, आज महत्त्वाचा दिवस आहे. आज विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. निकालांसह, तिन्ही राज्यांना त्यांचे नवे मुख्यमंत्री मिळतील. त्रिपुराच्या 60 -सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्रिपुरामध्ये 88 टक्के मतदान झालं होतं, मेघालयात 76 टक्के मतदान आणि नागालँडमध्ये 84 टक्के मतदान पार पडलं होतं.
तिन्ही राज्यांमध्ये 60 सदस्य विधानसभा आहे. ज्यामध्ये बहुसंख्य लोकांसाठी 31 जागा आवश्यक आहेत. त्रिपुरामध्ये भाजप-आयपीएफटीने एकत्र काम केलं आहे. तर पहिल्यांदाच कॉंग्रेस आणि माकपदेखील एकत्र निवडणुकीत उतरले आहेत. याशिवाय टिप्रा मोथा देखील रिंगणात आहेत. कॉंग्रेस, भाजप, नॅशनल पीपल्स पार्टी, तृणमूल कॉंग्रेस आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी हे मेघालयातील मुख्य पक्ष आहेत. तसेच, नागालँडमधील भाजप-एनडीपीपी अलायन्स, एनपीएफ, कॉंग्रेस यांच्यात स्पर्धा आहे.
नागालँडमधील गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच, 2018 च्या निवडणुकीत NPF ने 26 जागा जिंकल्या होत्या. एनडीपीपीला 17 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. बाकीच्या जागा इतरांनी जिंकल्या होत्या. काँग्रेसला मात्र गेल्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नव्हतं. 2018 च्या निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपने प्रथमच विजय मिळवला होता. 35 जागांवर भाजपने विजयाचा झेंडा फडकवला होता. सीपीएमच्या खात्यात 16 जागा आल्या होत्या. तर आयपीएफटीला 8 जागा मिळाल्या होत्या. तर त्रिपुरामध्ये काँग्रेसला मात्र खातंही उघडता आलं नव्हतं.
मेघालयमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. एनपीईपीने 19 जागा जिंकल्या होत्या. UDP ला 6 जागा मिळाल्या होत्या, तर पीडीएफने 4 जागा जिंकल्या होत्या. मेघालयात मात्र गेल्या निवडणुकीत भाजपची फारशी जादू चालली नव्हती. भाजपने 2 जागा जिंकल्या होत्या.
मेघालयात विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती?
मेघालयच्या गेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. 21 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण तो बहुमतासाठी कमी पडला. कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील NPP 19 जागांसह दुसऱ्या स्थानावर होतं. राज्यातील यूडीपीचे सहा सदस्य निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. तसेच, राज्यातील पीडीएफने चार जागा जिंकल्या होत्या आणि भाजप, एचएसपीडीपीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर संगमा यांनी भाजप, यूडीपी, पीडीएफ, एचपीपीडीपी आणि अपक्षांसह युतीचं सरकार स्थापन केलं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.
नागालँडचं राजकीय समीकरण
नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार आहे आणि नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. एनडीपीपी, भाजप, एनपीपी यांचा सरकारमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षीच एनडीपीपी आणि भाजपने संयुक्त पत्रकार परिषदेत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. एनडीपीपी 40 जागा आणि भाजप 20 जागांवर एकत्र लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात म्हटलं होतं.