डिपॉझिट म्हणून चिल्लर नाही चालणार भाऊ! लोकसभेचा फॉर्म भरताना निवडणूक आयोगाकडून 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' पॅटर्नवर निर्बंध
'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' चित्रपटातील चिल्लर पॅटर्नवर निवडणूक आयोगाकडून निर्बंध. चिल्लर स्वरुपात फक्त 1 हजार रुपये स्विकारले जाणार, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट.
Lok Sabha Elections 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Elections 2024) बिगुल वाजलं असून येत्या महिन्याभरात राज्यात पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अशातच सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपापल्या परीनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निवडणुकीचा फॉर्म भरताना निवडणूक आयोगाकडून काही अटी शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडून 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' (Gallit Gondhal Dillit Mujra) पॅटर्नवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
मराठी चित्रपट गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटात मकंरद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर निवडणूक अधिकाऱ्यासमोर ठेवली होती. त्यानंतर असे अनेक नारू खरोखरच्या निवडणुकीत प्रत्येकवेळी पाहायला मिळतात, मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नारूंचा गोंधळ बंद होणार आहे. कारण निवडणूक आयोगानं आता उमेदवारांची अनामत रक्कम म्हणून चिल्लर रुपात केवळ एक हजार रुपयेच देता येतील असं थेट जाहीरच करुन टाकलं आहे.
डिपॉझिट म्हणून सगळेच कॉइन नाही चालणार भाऊ
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाचा अनुभव आता प्रत्येक निवडणुकीत अधिकाऱ्यांना पाहायला मिळतो. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटतो. एक एक रुपया मोजताना, वेळ जातो तो वेगळा. आता लोकसभा निवडणुकीत तर एका मतदारसंघातून 400 पेक्षा अधिक मराठा उमेदवार राहणार असल्याचे निर्णय घेतले जात आहेत. सोबतच हे उमेदवार अनामत रक्कम म्हणून चिल्लर देणार आहेत म्हणे. पण कुठलाही उमेदवार यांना केवळ एक हजार रुपयांचेच कॉईन देता येणार आहेत.
निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर स्वरुपात पैसे भरणं आणि त्यामुळे जशी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटातील निवडणूक अधिकाऱ्यांची जी अवस्था होते, तीच अवस्था खऱ्याखुऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे यंदा मात्र निवडणूक अधिकाऱ्यांना धास्ती वाटणार नाही. कारण कोणताही उमेदवार अर्ज भरताना केवळ एक हजार रुपये चिल्लर स्वरुपात भरु शकणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळत नसल्यानं लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलन आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाला जिकिरीस आणण्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना, अनेकांकडून चिल्लर अनामत रक्कम म्हणून जमा केलं जाण्याची शक्यता आहे. यासाठी अनेकांनी आत्तापासूनच चिल्लर पैश्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे.
मराठा उमेदवारांचा प्लान काय?
- प्रत्येक मतदारसंघात 400 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करायचे
- प्रत्येक गावातून दोन लोकांनी उमेदवारी अर्ज भरायचं
- अनामत रक्कम म्हणून चिल्लर पैसे जमा करायचं
- आरक्षणाचा निर्णय न देणाऱ्या प्रशासनाला जिकिरीस आणायचं
आता मराठा आंदोलकांनी अशी भूमिका घेतली असून यामुळे मोठा गोंधळ उडणार आहे. या सगळ्यात गोंधळात गोंधळ म्हणून चिल्लर गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आधीच जाहीर करण्यात आलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना 1 हजारांपेक्षा अधिकची चिल्लर स्वीकारली जाणार नाही, असं स्पष्ट निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना 1 हजार पेक्षा आधी रकमेची चिल्लर घेणार नसल्याची भूमिका जरी प्रशासनाने घेतली असेल, तरी कुणीतरी या विरोधात न्यायालयात जाणार नाही याची शाश्वती काय? त्यामुळे लोकसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी जेवढी परीक्षा उमेदवारांचीच असेल, त्यापेक्षा अधिक निवडणूक अधिकाऱ्यांची असणार आहे.