Sanjay Raut : एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलं
Sanjay Raut on Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना ताप, घशात इन्फेकशन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Eknath Shinde Daregaon: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Daregaon) अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यानंतर ते त्यांच्या मूळगावी गेले होते. ते आजारी पडल्याची देखील माहिती आहे. आज एकनाथ शिंदे ठाण्याला परतणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे तीन दिवस साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. परंतु आजारी असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'ते आजारी आहेत. त्यांच्याबद्दल असे वेड्यावाकडे काही बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे ते हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनाही ते भेटले नाहीत इतकी त्यांची तब्येत खराब आहे अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू नका येत्या पाच तारखेला शपथविधीला ॲम्बुलन्स मधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे. हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी त्यांच्या अंगात जी भूत संचारले आहेत ती उतरवली पाहिजेत आता.पुढे बोलताना राऊत म्हणाले जर हे काम देवेंद्र फडणवीस करत असतील तर ही चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे', असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ शिंदेंना ताप, सर्दी आणि घशात इन्फेकशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना ताप, घशात इन्फेकशन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांना सलाइन लावण्यात आल्याची माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर चार जणांचे डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती.
दीपक केसरकर न भेटता गेले माघारी
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर आणि जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला काल त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. त्यानंतर दीपक केसरकर मुंबईकडे रवाना झाले.