Eknath Shinde And Narendra Modi: एकनाथ शिंदेंच्या हातावर नरेंद्र मोदींची थाप; उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंचावर नेमकं काय घडलं?, VIDEO
Eknath Shinde And Narendra Modi: महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी आझाद मैदानावर संपन्न झाला.
Eknath Shinde And Narendra Modi मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशभरातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंसह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींसह मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवत त्यांचं अभिनंदन केलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंचा हात घेत कौतुकाची थाप मारली आणि अभिनंदन केलं. यावेळी नरेंद्र मोदी काहीतरी बोलले आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह एकनाथ शिंदे आणि स्वत: नरेंद्र मोदी हसू लागले. यावेळेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शपथविधीनंतर लगेच मंत्रालयात-
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर काल एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तिन्ही नेत्यांनी वंदन केलं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
बदल्याचं राजकारण करायचं नाही, बदल दाखवेल, असं राजकारण करु, विरोधकांची संख्या कमी आहे, संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन करणार नाही, त्यांनी योग्य विषय मांडले तर त्यांचा सन्मान देऊ, स्थिर सरकारची पाच वर्ष पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील तिच आहे. राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येतं. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु, निकषात असतील त्यांना लाभ मिळेल, निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पूनर्विचार करु, मात्र सरसकट पूनर्विचार करणार नाही, असं देवेंद्र फडवणीस म्हणाले.