Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Gopal Shetty borivali vidhan sabha: गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. येथून भाजपचे संजय उपाध्याय महायुतीचे उमेदवार आहेत.
मुंबई: बोरिवली विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असलेले भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली होती. यानंतर गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोरिवलीतून माघार घेणार की नाही, याबाबत काहीच सांगितले नाही. परंतु, आपण अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोपाळ शेट्टी यांच्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गोपाळ शेट्टी यांच्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, गोपाळ शेट्टी आणि माझी आज भेट झाली. मी त्यांना बोरिवलीतून माघार घेण्याची विनंती केली. तुम्ही भाजपचे वरिष्ठ नेते आहात, आजवर तुम्ही पक्षशिस्त पाळली, पक्षाचा विचार केला. त्यामुळे आता तुमची नाराजी असली तरी तुम्ही पक्षाचाच विचार करावा. पक्षाची लाईन सोडू नये. गोपाळ शेट्टी यांची नाराजी ठीक आहे. पण माझा त्यांच्याबाबतचा वैयक्तिक अनुभव पाहता गोपाळ शेट्टी हे नेहमी पक्षाची लाईन पाळतात. त्यामुळे ते बोरिवलीतून माघार घेतील, अशी अपेक्षा आम्हाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. फडणवीसांनी 10 वर्षे अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. त्याबद्दल विचारले असता फडणवीसांनी म्हटले की, तुम्ही जयंत पाटील यांचा चेहरा बघा. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. त्यामुळे तुम्ही त्यांचे म्हणणे गंभीरपणे घेऊ नका, असे फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांना माहीम विधानसभा मतदारसंघातील तिढ्याबाबतही विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी यावर फार न बोलता काढता पाय घेतला.
गोपाळ शेट्टी काय म्हणाले?
गोपाळ शेट्टी आज सकाळी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. सागर बंगल्यावर या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी आशिष शेलार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, मी कुठल्याही परिस्थिती पक्ष सोडणार नाही. पक्षाने काढण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्ष सोडणार नाही. पक्षात असे काही लोक आहेत जे पक्षाला हानी पोहोचवतात. त्यांच्याशी माझी लढाई आहे, हे मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे, असे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.
आणखी वाचा
विनोद तावडेंसोबत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले, तासभराने बाहेर पडताच गोपाळ शेट्टी म्हणाले....