(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'गरिबीवर वार,72 हजार'; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
राफेल मुद्द्याचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश असणार आहे. राहुल गांधींसह सोनिया गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम आदी काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'जन आवाज' असं काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं नाव आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने शेतकरी, रोजगार, शिक्षण, युवकांवर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं दिसून येत आहे.
'गरिबीवर वार, 72 हजार'
काँग्रेसचा जाहीरनामा बनवण्याआधी जाहीरनामा समितीने जनतेशी संवाद साधून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. आमच्या जाहीरनाम्यात कोणतंही खोटं आश्वासन नाही. कारण आम्ही पंतप्रधानांप्रमाणे खोटं बोलत नाही.आम्ही पुढील पाच वर्षांवर लक्ष केंद्रीत केलं आहे, अशी माहिती राहुल गांधींनी दिली. सत्तेत आल्यानंतर गरीब जनतेसाठी आम्ही न्याय (NYAY) योजना लागू करणार आहोत. या योजनेअंतर्गत दरवर्षी 72 हजार रुपये गरिबांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. यावेळी राहुल गांधींनी गरिबीवर वार, 72 हजार अशी घोषणाही दिली. याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
युवकांना रोजगार उपलब्ध करणार
सध्या 22 लाख सरकारी जागा रिक्त आहेत. 2020 पर्यंत या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तर 10 लाख युवकांना ग्रामपंचायतीत रोजगार उपलब्ध करणार असल्याची घोषणाही राहुल गांधींनी केली. काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देऊ. तसेच व्यवसाय करण्यासाठी युवकांना पहिली तीन वर्ष कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेणे गरजेचं असणार नाही.
VIDEO | काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचं भाषण | नवी दिल्ली | एबीपी माझा
शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडला जाईल असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किती निधी उपलब्ध आहे, याची माहिती त्यांना मिळू शकेल. तसेच शेतकरी बँकांचे कर्ज फेडू शकले नाही तर तो फौजदारीऐवजी दिवाणी स्वरुपाचा गुन्हा समजला जाईल, असं राहुल गांधींनी जाहीर केलं.
जाहीरनाम्यात शिक्षण आणि आरोग्यावर भर
सत्तेत आल्यास जीडीपीच्या 6 टक्के पैसा शिक्षण क्षेत्रावर खर्च करु असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. महत्त्वाच्या शिक्षण संस्थांमध्ये गरिबांना सहजरित्या पोहोचता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. आम्ही खासगी विमा कंपन्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे गरीब नागरिकांना मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचं आश्वासनही काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.
राहुल गांधींसह सोनिया गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम आदी काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.
काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राफेल मुद्द्याचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास पहिल्या दिवसापासून राफेल घोटाळ्याची चौकशी सुरु करु अशी माहिती मुणगेकर यांनी दिली.
VIDEO | सत्तेस आल्यानंतर पहिल्याच दिवशी राफेलची चौकशी करणार, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात उल्लेख | एबीपी माझा