(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar: 'CM' भाजपचाच होणार, ते फक्त फडणवीस की...', रोहित पवारांनी बड्या नेत्याचा उल्लेख करत सस्पेन्स वाढवला
Rohit Pawar: मुख्यमंत्रीपदावरून सध्या चर्चांना उधाण आलं आहे, अशातच राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार पण तो कोण असणार असं म्हणत सस्पेन्स वाढवला आहे.
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. मात्र, आता राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असतानाच आता दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्रीपदावरून सध्या चर्चांना उधाण आलं आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) मुख्यमंत्री भाजपचाच होणार पण तो कोण असणार असं म्हणत सस्पेन्स वाढवला आहे.
पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे...
मुख्यमंत्रीपदाबाबत घोळ आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राज असल्याच्या चर्चा आहेत. आकडे जर बघितले तर भाजपाचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे, जर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खूप वेळ घालवला तर अजित पवार आणि भाजप मिळून सत्ता स्थापन करू शकतात. जर अजित पवार यांनी वेळ घालवला तर भाजप आणि एकनाथ शिंदे सरकार स्थापन करू शकतात. त्यामुळे आता बरंच काही दिवस या गोष्टी चालतील, असं नाही. पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे. सगळ्यांना माहिती आहे. काय होणार आहे. भाजपला मुख्यमंत्रीपद तिथं येऊ शकते. फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. नाहीतर पाच वर्ष मुख्यमंत्री हे भाजपकडेच राहील. भाजपने सांगितलं अडीच अडीच वर्ष तर अडीच वर्ष होईल आणि पुढच्या अडीच वर्षात देखील भाजपचाच राहील, असंही यावेळी बोलताना रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री हा भाजपचा झाला तर होईल फक्त देवेंद्र फडणवीस होतील, की...
अजित दादांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, अजितदादांना मुख्यमंत्री पद दिले तर चांगली गोष्ट आहे. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचे स्वागत करू. अभिनंदन करू. पण भाजपाला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजित दादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही. एकनाथ शिंदे यांना गेल्या अडीच ते तीन वर्षापासून मुख्यमंत्री पद दिलं असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मागण्याचा अधिकार आहे. म्हणून फक्त ते थोडंसं पुढे मागे करत आहेत. जर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षात मुख्यमंत्री पद मिळाला नसतं तर मग एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपद मागितले नसते. त्यामुळे शेवटी भाजपाला ताकद खूप मोठी मिळालेली आहे. मुख्यमंत्री हा भाजपचा झाला तर होईल फक्त देवेंद्र फडणवीस होतील, की महाराष्ट्रातील एक भाजपचा नेता जो 2019 ला त्याला तिकीट नाही. त्या नेत्याने केंद्रात जाऊन चांगली काम केली, अशा व्यक्तीला दिला जाईल. हे मात्र सांगता येणार नाही असंही रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं आहे.
तो नेता कोण?
रोहित पवारांच्या (Rohit Pawar) या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. रोहित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता विनोद तावडेच ते नेते आहेत का? मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे का? अशा चर्चा आता सुरू आहेत.