मी माझ्या साडेचार वर्षांची कामे सांगतो, तुम्ही 15 वर्षांची कामे सांगा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आव्हान
गेल्या साडेचार वर्षात आम्ही सर्वसामान्य जनतेला ग्राह्य धरून कामे केली आहेत. रस्ते कामात विक्रम झाला आहे. केवळ घोषणा नाही तर कामाची सुरुवात केली. जर हे असत्य असेल तर मी आजच हार मानत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लातूर : खुल्या व्यासपीठावर समोर या, मी माझ्या साडेचार वर्षांची कामे सांगतो, तुम्ही 15 वर्षांची कामे सांगा, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे 11 हजार 680 कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.
गेल्या साडेचार वर्षात आम्ही सर्वसामान्य जनतेला ग्राह्य धरून कामे केली आहेत. रस्ते कामात विक्रम झाला आहे. केवळ घोषणा नाही तर कामाची सुरुवात केली. जर हे असत्य असेल तर मी आजच हार मानत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सातत्याने येणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ज्याठिकाणी अधिक पाणी आहे, तेथून पाणी आणण्यासाठी जल आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या काही वर्षात आणि काही महिण्यात सर्वच प्रश्न मार्गी लागतील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 4700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आता आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे : गडकरी
राज्यात 50 हजार किलोमीटरचे रस्त्ये तयार होत आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 15 हजार किलोमीटर, राज्यमार्ग 10 हजार किलोमीटर आणि मुख्यमंत्री ग्रामसडकची 30 हजार किलोमीटरची कामे पूर्ण होत आहेत. मी केलेल्या घोषणा पूर्ण करु शकलो याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला.
आता मला आणि व्यासपीठावरील सर्व भाजपाच्या नेत्यांना आपल्या आशीर्वादाची आवश्यकता असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मागील पाच वर्षात सरकारने काय कामे केलीत ती लोकांपुढे ठेवली. उपस्थितांची मुले जिवंत असेपर्यंत जिल्ह्यातील रस्त्यावर खड्डे पडणार नाही, असं आश्वासनही गडकरींनी दिलं.
राज्यातील पाणी समस्या गंभीर आहे. राज्यात नदीजोड प्रकल्प सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली.
ऊसापासून साखर करण्याऐवजी इथेनॉल तयार करण्याची गरज आहे. इथेनॉलवर चालणारी वाहने वाढविणे गरजेचे आहे. ही सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आशीर्वाद गरजेचे आहेत, असं गडकरी म्हणाले.