Ashwini Jagtap: चिंचवड विधानसभेमध्ये शंकर जगतापांची बाजी, अश्विनी जगतापांचं तिकिट कापलं, दिराचा प्रचार करणार का? म्हणाल्या, 'मी आधी...'
Chinchwad Assembly constituency: भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांना डावलले आणि दिर शंकर जगतापांना चिंचवड विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
पुणे: निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये काही नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे, तर काही विद्यमान आमदांराना पुन्हा एकदा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आलं आहे. विषेश म्हणजे पुण्यातील ज्या महत्त्वाच्या ठिकाणच्या निकालाकडे राज्याचं लक्ष असतं त्या मतदारसंघामध्ये पुन्हा त्याच नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे. फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर आमदार झालेल्या अश्विनी जगताप यांना तिकीट न देता, त्यांचे दिर शंकर जगतापांना तिकीट देण्यात आलेलं आहे. विधानसभेसाठी शंकर जगताप देखील इच्छुक होते.
भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांना डावललं आणि दिर शंकर जगतापांना चिंचवड विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. दिर-भावजयाच्या राजकीय संघर्षात शंकर जगतापांनी अखेर बाजी मारल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्यानंतर अश्विनी जगतापांनी मी स्वतः प्रचारात उतरणार असल्याचं म्हणत कौटुंबिक राजकीय संघर्षांवर पडदा टाकला आहे. मात्र दुसरीकडे शंकर जगतापांसमोर पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधाला अद्याप सामोरं जायचं आहे.
शंकर जगताप यांची प्रतिक्रिया
आमच्यामध्ये कौटुंबिक किंवा राजकीय असा कोणताच वाद नव्हता. आमचं एकत्र कुंटूब आहे, होतं आणि ते कायम राहणार आहे. मी माझी उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. अनेक इच्छुकांमध्ये माझी निवड केली, काही इतर उमेदवार देखील इच्छुक होते, आताही आहेत. महायुतीत बंडखोरी होणार नाही. सर्वजण एकत्रित येऊन आम्ही लढू. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आधिपासून काही ठरवलेले नियम होते, ज्यांच्याकडे जो मतदारसंघ होता, त्यांना त्या जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी होऊ न देता सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया
घरातच तिकिट मिळालं आहे.घरापासूनच आता प्रचाराला सुरूवात करायची आहे. त्यामुळे खंत नाही, वाद नाही. मी आधीही सांगितलं होतं ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करेन असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याच विद्यमान आमदारांना उमेदवारी
पुन्हा एकदा दौंड मतदारसंघातून राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप, शिवाजीनगर मधून सिध्दार्थ शिरोळे, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, तर पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या पुण्यातील महत्त्वांच्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांव्यतिरिक्त अनेक नेते निवडणूक लढवण्यात इच्छुक होते, मात्र पक्षांने ही जबाबदारी ज्या-त्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या खांद्यावर टाकली आहे. चिंचवड वगळता बाकी मतदारसंघात विद्यमान आमदारांना संधी दिली आहे.