उद्धव ठाकरेंना संपविण्याचे काम काँग्रेस करत आहेत; रमेश चेन्निथला यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर
काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्राचा अभ्यास नाही. उद्धव ठाकरेंना संपविण्याचे काम काँग्रेस करत आहेत. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील पक्षात अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणावर आहेत. महायुती एक विचित्र युती आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदेंच्या पक्षाच्या जागावरती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जागांवरती भाजप आपले उमेदवार देत आहे, त्यांच्या ठिकाणी देखील निवडणूक लढवत आहे. महायुतीचा कोणता प्रवाभ नाही, किंवा त्यांचे अस्तित्व देखील नाही. भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीतून संपवलं असल्याचं काँग्रेस नेते रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी म्हटलं आहे.
यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्राचा अभ्यास नाही. उद्धव ठाकरेंना संपविण्याचे काम काँग्रेस करत आहेत. आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरेंना किमान 171 वगैरे जाग मिळायच्या. मात्र आता ते जागावाटपात मागे पडत आहेत. किंबहुना ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार लढत आहे. आम्ही मातोश्रीचा सन्मान करायचो. पण आज काँग्रेस ठाकरेंच्या जागांवर निवडणूक लढवत असल्याचे चित्र असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसने मुस्लिम समाजाशी बेईमानी केली- चंद्रशेखर बावनकुळे
भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही, अशी टीका विरोधकांनी केली. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसला आमचा उलट प्रश्न आहे की, त्यांनी मुस्लिम परिवार आणि नेत्यांवर अन्याय केलाय. केवळ मतांसाठी वापर केलाय. विधानसभेपर्यंत नेतृत्व तयार करावे लागेल असे सांगून काँग्रेसने लोकसभेत मुस्लिम समाजाला भीती दाखवली आणि मते गोळा केली. भाजप मुस्लिम विरोधी आहे, असं काँग्रेसने भासवलं. काँग्रेसने मुस्लिम नेते असूनही उमेदवार दिले नाहीत, त्यांनी मुस्लिम समाजाशी बेईमानी केली, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
राज्यातील काही मोजक्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत
राज्यातील काही मोजक्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. अशा काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. दरम्यान या बाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा सोबत बसून ठरवतील. तर पक्षांतर्गत बंडखोरी होते आहे. इच्छूक नेते नाराज आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणी मी बोलणं योग्य नाही, यावर दादा बोललेत. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक बोलणे टाळले आहे. तर भाजपने कमी जागा का लढल्या? असे विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुती आकड्यांसाठी निवडणूक लढत नाही. महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा