Buldhana Lok Sabha Result 2024 : दोन शिवसैनिकांच्या लढतीत महायुतीच्या प्रतापराव जाधवांनी बुलढाण्याचा गड राखला; नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकरांचा पराभव
शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर बुलढाणा मतदारसंघांमध्ये दोन शिवसैनिक आमने-सामने उभे ठाकल्याचे बघायला मिळाले. मात्र, दोन शिवसैनिकांच्या लढतीत महायुतीच्या प्रतापराव जाधवांनी बुलढाण्याचा गड राखलाय.
Lok Sabha Election Result 2024 बुलढाणा : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता हाती येऊ लागले आहे. त्यानंतर आता देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेला मतदानाचा कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसले आहे. अशातच विदर्भातील महायुतीला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. विदर्भातील दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवत बुलढाण्याचा गड प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी राखला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांच्या लढतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पराभव करत विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडली आहे.
महायुतीच्या प्रतापराव जाधवांनी बुलढाण्याचा गड राखला
राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा या शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक 23 जागा या भाजपने लढवल्या, तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवारांनी चार जागा लढवल्या आहेत. तर त्यापैकी विदर्भात 10 मतदारसंघाचे अंतिम निकाल पुढे आले आहे. अशातच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदार संघातून 29, 376 मतांनी विजय मिळवला आहे.
आज मतमोजणी दरम्यान अखेरच्या 25 व्या फेरीमध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांना3, 48, 238 मते मिळाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना 3,18, 862 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना 2,48, 977 इतके मते मिळाली आहे. या तिरंगी लढतीत प्रतापराव जाधव यांचा 29376 मतांनी विजय झाला आहे.
तिरंगी लढतीत नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकरांचा पराभव
शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) पाच मतदारसंघांमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी प्रतिष्ठेची लढत लढल्या गेली. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा (Buldhana Lok Sabha Election 2024) सुद्धा समावेश होता. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनाच पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलं, तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना उमेदवारी देण्यात आली.
कधीकाळी एकसंघ राहिलेले शिवसेना पक्षाने (Shiv Sena) बुलढाणामध्ये तीन दशकांपासून आपला विजयी झेंडा रोवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1989 मध्ये मेहकरमध्ये घेतलेल्या सभेनंतर ते आतापर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, यंदा शिवसेनेमधील ऐतिहासिक उभ्या पक्ष फुटीनंतर 2024 ची लोकसभा निवडणुकीत यंदा प्रतापराव जाधव या शिवसैनिक या मतदारसंघात विजयी मोहर उमटवत गड राखलाय.
मत विभाजन कळीचा मुद्दा ठरला
लोकसभेच्या निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात यावेळी 10 अपक्षांसह 11 पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे आता मतविभाजनाचा खेळ कुणाला विजय तर कोणाला पराजय दाखवतो या कडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. गेल्या सहा ते सात लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर मत विभाजनाचा टक्का हा सरस ठरला आहे. यावेळी एकूण 21 उमेदवार उभे राहिल्याने मत विभाजन या मुद्द्यालाही मोठे महत्त्व प्राप्त झाल होते.
तसं पाहता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होत असली तरी तिसरा आणि चौथा उमेदवार मतांच्या शर्यतीत कितपत प्रभावी ठरतो, यावर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विजयाची गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे मत विभाजन हाच बुलढाण्याच्या निवडणुकीत विजय आणि पराभवास कारणीभूत ठरलेला मुद्दा आहे.
विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेला एकमेव विजय
महायुती आणि महाविकास आघाडी मधील नाराजी नाट्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे पडदा पडला असला तरी, निवडणुकीच्या उत्तरार्धातील मतांच्या राजकारणाची खरी लढाई झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात वंचित ने 16 टक्के मते घेत दुरंगी लढत तिरंगी केली होती आणि त्यामुळे यावेळेसही वंचितवर नजर होती. त्यातच अपक्ष म्हणून लढणारे वन मिशनचे संदीप शेळके आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर हेही निवडणुकीच्या निकालासाठी महत्त्वाचे उमेदवार ठरले होते.
शिवसेनेमधील ऐतिहासिक उभ्या पक्ष फुटीनंतर 2024 ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची मानल्या जात आहे. विद्यमान खा. प्रतापराव जाधव विरुद्ध उद्धवसेनेचे प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यात थेट लढत जरी दिसत असली, तरी त्यात मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही प्रचारात मजल मारत सरळ लढत ही तिरंगी केली होती. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झालेली लढत ही तिरंगी लढत मानल्या गेली.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल (Buldhana Lok Sabha Result 2024)
उमेदवाराचं नाव | पक्ष | विजयी की पराभूत? |
प्रतापराव जाधव | महायुती (शिवसेना शिंदे गट ) | विजयी |
नरेंद्र खेडेकर | महाविकास आघाडी (शिवसेना ठाकरे गट) | पराभव |
रविकांत तुपकर | अपक्ष (शेतकरी नेते) | पराभव |
संदीप शेळके | अपक्ष (बुलढाणा वन मिशन) | पराभव |
वसंत मगर | वंचित बहुजन आघाडी | पराभव |
कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान?
बुलढाणा मतदारसंघात 63.22% टक्के मतदान झाले होते.
- बुलढाणा - 53.96 %
- चिखली - 62.21 %
- जळगाव जामोद - 63.58 %
- खामगाव - 66.27 %
- मेहकर - 64.84 %
- सिंदखेडराजा - 61.34 %
कोणत्या मतदारसंघात कोण आमदार?
बुलढाणा - संजय गायकवाड ( शिंदे गट )
चिखली - श्वेता महाले ( भाजपा )
मेहकर - संजय रायमुलकर ( शिंदे गट )
सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे ( राष्ट्रवादी अजित पवार )
खामगाव - आकाश फुंडकर ( भाजपा )
जळगाव जामोद - संजय कुटे ( भाजपा )
खा.प्रतापराव जाधव हे 1,45000 मतांनी विजयी झाले होते.
बुलढाणा मतदारसंघांमध्ये कोणाची किती ताकत?
बुलढाणा लोकसभेमध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. बुलढाणामधून संजय गायकवाड आमदार आहेत. चिखलीमधून भाजपच्या श्वेता महाले आमदार आहेत. सिंदखेडराजा मधून राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. मेहकरमधून संजय रायमुलकर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. खामगावमधून आकाश फुंडकर हे भाजपचे आमदार आहेत. तर जळगावमधून संजय कुटेही भाजपचे आमदार आहेत.
मिशन 45+ च्या अंतर्गत भाजपकडून सुद्धा या मतदारसंघांमध्ये असणारी ताकद लक्षात घेता दावा करण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी सोबत आलेल्या खासदारांसाठी बळ लावताना पुन्हा एकदा उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे भाजपला एक पाऊल माघारी जावं लागलं आहे. प्रतापराव जाधव यांच्या गळ्यामध्ये उमेदवारी पडली आहे. या मतदारसंघांत तीन भाजप आमदार आहेत, तर एक राष्ट्रवादीचा आमदार आहे तर दोन शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.