Election Result : मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, कप्तान मलिक यांना धक्का, मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ पराभूत, तेजस्वी घोसाळकरांचं काय झालं? 29 महापालिकेतील 10 थरारक निकाल
Maharashtra Mahapalika Result : पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना अमरावतीमधून पराभव पत्करावा लागला आहे.

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल समोर आले असून बहुतांश ठिकाणी भाजपने विजय मिळवल्याचं चित्र आहे. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये मुंबईतील पहिला निकाल हा काँग्रेसच्या उमेदवाराचा आला, धारावीमधून आशा काळे निवडून आल्या. त्याचवेळी ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकरांनी मोठा विजय मिळवला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अमरावतीमधून पराभूत झाले आहेत.
Maharashtra Mahapalika Elections Result : राज्यातील 10 थरारक निकाल
1.मुंबईतील धारावी भागातील प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसने पहिला विजय नोंदवला आहे. काँग्रेसच्या आशा काळे या 1450 मतांनी निवडून आल्या आहेत. आशा काळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत.
2. प्रभाग क्रमांक दोन मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर 10,755 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या फोरम परमार आणि काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांचा पराभव केला.
3. मुंबईतील प्रभाग क्रमांक 165 मध्ये काँग्रेसचे आशरफ आझमी विजयी झाले आहेत. अशरफ आझमी यांनी कप्तान मलिक पराभूत केलं आहे. कप्तान मलिक हे नवाब मलिक यांचे बंधू आहेत.
4. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने पहिला विजय नोंदवला आहे. मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांचा विजय झाला आहे.
5. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना शिंदे गटाच्या शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला आहे. शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसच्या राहुल माने यांचा पराभव केला. हा काँग्रेस नेते सतेज पाटील यांना धक्का समजला जातो.
6. शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेले पुण्यातील प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 18 ड मधून प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला आहे.
7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती हे अमरावतीमधून पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे चार ही उमेदवार विजयी झाले आहेत.
8. छत्रपती संभाजीनगरमधून शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी दोघांचाही विजय झाला आहे.
9. मुंबईतील शिंदेंचे खासदार रविकांत वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.
10. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी रवी राणांचे निकटवर्तीय युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे विजयी झाले आहेत.




















