मोठी बातमी : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, समाधान सरवणकर, दीप्ती वायकर पराभूत, मुंबईत कुणाकुणाचे नातेवाईक हरले?
BMC Election News : सदा सरवणकरांचा मुलगा, राहुल शेवाळेंच्या वहिनी, रवींद्र वायकरांची मुलगी यांच्यासह अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का बसला आहे.

मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये यंदा मतदारांनी घराणेशाही मोठ्या प्रमाणात नाकारल्याचं दिसून आलं. त्यातल्या त्यात त्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसल्याचं दिसून आलं. शिंदेंचे नेते सदा सरवणकर यांच्या मुलाला पराभवाचा धक्का बसला आहे. त्याचसोबत शिंदेंचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मुलीलाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या दोन्ही ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार निवडून आले आहेत.
Samadhan Sarvankar Result : समाधान सरवणकरांचा पराभव
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 194 मधून विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा 603 मतांनी पराभव केला. समाधान सरवणकर यांच्याकडून EVM मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांची मुलगी पूजा महाडेश्वर यांनी प्रभाग क्रमांक 87 मधून विजय मिळवला आहे.
Dipti Waikar Result : रवींद्र वायकरांना धक्का
शिंदेंचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा धक्का बसला असून त्यांची मुलगी दीप्ती वायकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोणा रावत यांनी दीप्ती वायकर यांचा पराभव केला आहे.
ठाकरे गटाचे नेते मनोज जामसूतकर यांची मुलगी सोनम जामसूतकर यांनी प्रभाग क्रमांक 210 मधून विजय मिळवला आहे.
Nawab Malik News : नवाब मलिकांना मोठा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे बंधू कप्तान मलिक यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 165 मध्ये काँग्रेसचे आशरफ आझमी विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या रोशनी गायकवाड यांचा पराभव केला.
Yogita Gawli Lost : योगिता गवळींचा पराभव
अरूण गवळी यांची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांचा पराभव झाला आहे. भायखळामधून भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.
Vaishali Shewale Lost : वैशाली शेवाळेंचा पराभव
मुंबईतील धारावी भागातील प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे या 1450 मतांनी निवडून आल्या आहेत. आशा काळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत.
Tejasvee Ghosalkar Result : तेजस्वी घोसाळकर विजयी
विनोद घोसाळकरांची सून आणि भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकरांनी प्रभाग क्रमांक 2 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
ही बातमी वाचा:




















