Ravindra Chavan : संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांवर गोळीबार करणारे काँग्रेसचेच राज्यकर्ते, ठाकरे गटाला सोयीस्कर विसर; रवींद्र चव्हाणांची टीका
Ravindra Chavan On Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंना लगावला.

मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचं पाप काँग्रेसचंच आहे, हे इतिहासात नोंदलेलं सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेवेळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या आंदोलनावर गोळीबार करणारे सरकार हे राज्यातही आणि केंद्रातही काँग्रेसचंच होतं, हा सोयीस्कर विसर ठाकरेंना पडतो, असा आरोप त्यांनी केला.
या घटनांतूनच प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ शिवसेनेची स्थापना केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र आज ठाकरे गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मराठीचा कैवार घेत आहे, ही मोठी विसंगती असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले.
'काँग्रेससोबत सत्तास्थापन म्हणजे हुतात्म्यांचा अपमान'
काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करून 105 हुतात्म्यांचा अपमान केला. केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करताना मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे, असा हल्लाबोल रवींद्र चव्हाण यांनी केला.
कोकण रेल्वे आणि विकासाचा मुद्दा
1990 च्या दशकात कोकण रेल्वे सुरू झाली ती काँग्रेसमुळे नव्हे, तर मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांमुळे. 2014 नंतर मात्र भाजप सरकारच्या काळात कोकण रेल्वेवरील स्थानकं सुसज्ज झाली आणि परिसराचा कायापालट झाला. काँग्रेसने कोकणासाठी काहीच केलं नाही, असा आरोपही रवींद्र चव्हाण यांनी केला.
मराठीचा कैवार आणि वास्तव
ठाकरेंची सेना आणि मनसे हे इतरांपेक्षा जास्त मराठीचे कैवारी कसे, असा सवाल उपस्थित करताना चव्हाण म्हणाले की, अमराठी भाषिक भाजपात मराठीद्वेषातून येत नाही, तर इतर पक्षांमध्ये नेतृत्व, विचारधारा आणि भवितव्य मर्यादित असल्यामुळे भाजपात येतो, हे वास्तव आहे.
भाजपाचे मराठीसाठी ठोस काम
भाजपाने मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसासाठी ठोस काम केलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.
BDD चाळ पुनर्विकास
मुंबईतील BDD चाळींमधील मराठी बांधवांना हक्काचं घर मिळालं, ते केवळ देवेंद्र फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळेच शक्य झालं. निवडणुका आल्या की ठाकरेंना मराठी माणूस आठवतो, अन्यथा पाच वर्षे मराठी हा शब्दही विसरलेला असतो, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली.
‘मी मराठी’ ते ‘मी मुंबईकर’, ओळख पुसण्याचा आरोप
“मी मराठी” ही ओळख बदलून “मी मुंबईकर” ही संकल्पना कोणी लादली, आणि मुंबईची मराठी ओळख पुसण्याचं पातक कोणी केलं, याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हान रवींद्र चव्हाण यांनी दिलं. भावनांचे बुडबुडे नव्हे तर प्रत्यक्ष काम महत्त्वाचं असतं, आणि ते काम फक्त भाजपाने करून दाखवलं आहे असंही ते म्हणाले.




















