Haryana Election : उद्योगपती लेक भाजपचा खासदार, पक्षानं विधानसभेची उमेदवारी नाकारताच सावित्री जिंदाल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
Savitri Jindal : भाजपचे लोकसभा खासदार नवीन जिंदाल यांची आई सावित्री जिंदाल हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
![Haryana Election : उद्योगपती लेक भाजपचा खासदार, पक्षानं विधानसभेची उमेदवारी नाकारताच सावित्री जिंदाल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात BJP Leader Savitri Jindal will File nomination as independent candidate Haryana assembly election hisar marathi news Haryana Election : उद्योगपती लेक भाजपचा खासदार, पक्षानं विधानसभेची उमेदवारी नाकारताच सावित्री जिंदाल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/12/3f75b9e9c26af625e08d7b5f328c810f1726127120492989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंदीगड : उद्योगपती आणि भाजप नेत्या सावित्री जिंदाल आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. सावित्री जिंदाल हिसार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदल यांच्या त्या आई आहेत. सावित्री जिंदाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलं की प्रभूच्या कृपेनं आणि आपल्या हिसारच्या कुटुंबानं मला 5 सप्टेंबरला जो आदेश दिली आहे, त्या आशीर्वादासह आज 12 सप्टेंबरला अर्ज हिसार विधानसभा मतदारसंघात विकास आणि परिवर्तनासाठी उमेदवारी अर्ज भरत आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम हाच माझा आशीर्वाद आहे.
सावित्री जिंदाल यांना भाजपकडून हिसार विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, पक्षानं आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार कमल गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर सावित्री जिंदाल यांनी 9 सप्टेंबरला अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. जे समर्थक बोलतील ते करणार, मी निवडणूक लढवणार आहे, नक्कीच लढवणार असून ही शेवटची निवडणूक आहे. मला सेवा करायची आहे, असं सावित्री जिंदाल म्हणाल्या होत्या.
सावित्री जिंदाल यांचं मनपरिवर्तन करण्याचा भाजप नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात भाजप नेत्यांना यश आलं नाही. सावित्री जिंदाल आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. आता खासदार नवीन जिंदाल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सावित्री जिंदाल या भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत. देशातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत असलेल्या सावित्री जिंदाल यांनी मार्च महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवीन जिंदाल भाजपमध्ये गेल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला होता.
सावित्री जिंदाल हिसार या विधानसभा मतदारसंघात दोनवेळा पराभूत झाल्या आहेत. तर 2005 आणि 2009 ला त्या या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. हरियाणातील हुड्डा सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. हिसार येथून सावित्री जिंदाल यांचे दिवंगत पती ओ.पी. जिंदल आमदार होते. हरियाणा सरकारमध्ये देखील मंत्री होते.
सावित्री जिंदाल हिसारच्या जागेवर 2014 च्या निवडणुकीत कमल गुप्ता यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. 2019 ला काँग्रेसनं या जागेवर उमेदवार बदलला होता. राम निवास सारा यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी देखील कमल गुप्ता यांनी विजय मिळवला होता.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)